आगामी काळात जनतेचे समर्थन शिवसेनेलाच

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई : पदाधिकारी संवाद निश्चय मेळावा उत्साहात

आगामी काळात जनतेचे समर्थन शिवसेनेलाच

सोलापूर : प्रतिनिधी

सध्याची परिस्थिती कशीही असो येणारा काळ हा शिवसेनेचा आहे. आगामी काळात जनतेचे समर्थन शिवसेनेलाच असणार आहे असा विश्वास युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्हा युवा सेनेतर्फे सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पदाधिकारी संवाद निश्चय मेळावा उत्साहात झाला. यावेळी युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत, युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य अमेय घोले, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. धनराज कोसाडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, भाऊसाहेब आंधळकर, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, प्रा. अजय दासरी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख स्वप्निल वाघमारे आदी उपस्थित होते.

प्रारंभी युवासेना सोलापूर जिल्ह्याच्यावतीने तसेच इतर पदाधिकाऱ्यांतर्फे वरूण सरदेसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. सरदेसाई म्हणाले, जनतेच्या मनात शिवसेना लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेचे मतात रुपांतर करण्याची जबाबदारी शिवसैनिक आणि युवा सैनिकांची आहे. त्याकरिता गाव पातळीवर युवासेना पदाधिकारी संवाद अभियान सुरु करा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. आपली तलवार आणि ढाल आपल्याच लोकांवर वापरण्याऐवजी विरोधकांवर वापरा, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या मागील सिनेट निवडणुकीत युवासेनेकडून पदवीधरांची झालेली नोंदणी अत्यल्प होती. प्रत्येक विधानसभेत असलेल्या एकूण मतदारसंख्येपैकी एक टक्का पदवीधरांची जरी नोंदणी आगामी अधिसभेच्या निवडणुकीसाठी झाली तरी त्याचा मोठा परिणाम दिसून येईल, असेही श्री. सरदेसाई म्हणाले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.
---------------
युवा सेनेची सदस्य नोंदणी
१५ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेची राज्यव्यापी सदस्य नोंदणी सुरू होणार आहे. या नोंदणीतून राज्यात १५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सोलापूर जिल्ह्यातून ५० हजार सदस्यांची नोंदणी करावी, असे आवाहनही युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी उपस्थित पदाधिकारी आणि युवा सैनिकांना केले.
--------------------------
युवासैनिकांनी दाखवावे परिणामकारक काम

केवळ घोषणा देऊन, बॅनर लावून शिवसेनेचे काम करण्याला अर्थ नाही. आपल्या कामातून पक्षाला फायदा व्हावा असे परिणामकारक काम करा, असे आवाहनही युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी युवासैनिकांना याप्रसंगी केले.
------------------------