रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपास काशी जगद्गुरु प्रमुख अतिथी

नागपूरला झाले रवाना : सोलापूरकर भाविकांनी शुभेच्छा देऊन घेतले आशीर्वाद

रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपास काशी जगद्गुरु प्रमुख अतिथी

सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुवारी (दि. ८) नागपूरातील रेशीमबागेत होणाऱ्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमास श्री काशी महापीठाचे जगद्गुरु श्री मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्वयंसेवकांना उद्बोधनही होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षभरातील उपक्रमामधील तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग हा राष्ट्रीय स्तरावरील एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम दरवर्षी परंपरेनुसार नागपुरात होतो. या संघ शिक्षा वर्गासाठी देशभरातून निवडक स्वयंसेवक उपस्थित असतात. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाप्रसंगी सरसंघचालकांचे होणारे मार्गदर्शन म्हणजे संघाच्या सर्वस्पर्शी भूमिकेचे आणि आगामी वाटचालीचे सुस्पष्ट विवरण असते. अशा रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती आणि होणारे आशिर्वचन सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे.

रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमासाठी मंगळवारी काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी नागपूरला रवाना झाले. यावेळी अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेचे अध्यक्ष ष. ब्र. श्री. श्रीकंठ शिवाचार्य (नागणसूर), ष. ब्र. श्री. रेणुक शिवाचार्य (मंदृप), श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे अध्यात्मिक विभागाचे प्रमुख मनोज हिरेहब्बु, श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे, प्राचार्य राजकुमार भोरे, प्राचार्य संगप्पा म्हमाणे, गुड्डापुर देवस्थानचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी, सिद्धाराम पाटील, हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे संयोजक चिदानंद मुस्तारे, मल्लिनाथ पाटील, राहुल पावले, सिद्धारुढ हिटनल्ली, सागर हुमनाबादकर, कल्लया स्वामी आदी उपस्थित होते.

हिंदू वीरशैव लिंगायत मंचातर्फे सोलापूर शहरातील आठ ठिकाणी संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.