आज २१ हजार भाविकांना मिळणार नेपाळहून आलेले अभिमंत्रित रुद्राक्ष

अतिरुद्र स्वाहाकाराची आज होणार सांगता : कुंकूमार्चना आणि पूर्णाहुतीचे आयोजन

आज २१ हजार भाविकांना मिळणार नेपाळहून आलेले अभिमंत्रित रुद्राक्ष

सोलापूर : प्रतिनिधी

भाविकांना २१ हजार रुद्राक्ष वाटपाने आज रविवारी सकाळी ९ वाजता अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता होणार आहे, अशी माहिती श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी दिली.

विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान विश्वशांती व धर्मजागृतीसाठी आयोजित अतिरुद्र स्वाहाकार भाविकांच्या गर्दीत अत्यंत भक्तिमय वातावरणात झाला. अतिरुद्र स्वाहाकाराची पूर्णाहुती रविवारी सकाळी होणार आहे. त्यानिमित्त श्री अतिरुद्र मंत्राने अभिमंत्रित केलेल्या २१ हजार रुद्राक्षांचे वाटप भाविकांना करण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी कुंकुमार्चना व धर्मसभा होणार आहे. 

रविवारी होणाऱ्या पूर्णाहुतीच्या कार्यक्रमास श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष प. पू. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेनेचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री अक्षय महाराज भोसले, पुणे एअर पोर्ट अथोरीटीचे प्रमुख धानेश स्वामी, अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, अदौनीचे आमदार गुमनुरू जयराम, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली - उगले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.