अबब ! केसीआर यांचे सोलापूरात मोठे शक्तीप्रदर्शन
शहरात ५०० गाड्यांचा ताफा कसा आला ? पहा व्हिडिओ
सोलापूर : प्रतिनिधी
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आज सोमवारी सोलापुरात प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळात सोबत आलेल्या तब्बल ५०० गाड्यांच्या ताफ्याने शहरातून केलेल्या प्रवास करून सोलापूरकर थक्क झाले.
पहा व्हिडिओ :
सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ तसेच शहरात चौकाचौकांमध्ये के. चंद्रशेखर राव यांचे छायाचित्र असलेले पक्षाचे गुलाबी झेंडे, गुलाबी पताका लावण्यात आल्या होत्या. हॉटेल बालाजी सरोवर येथे आल्यानंतर केसीआर यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा तयार करणाऱ्या संतोष पवार यांनी ठिकठिकाणी डिजिटल फलक लावून आपल्या आगामी राजकीय वाटचालीचा संदेश दिल्याचे दिसत होते. हॉटेल बालाजी सरोवर येथे प्रचंड मोठा पुष्पहार घालून के. चंद्रशेखर राव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एका विशेष बसमध्ये बसलेल्या के. चंद्रशेखर राव यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हॉटेल बालाजी सरोवर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
पंढरपुरात राज्यभरातून जमणारे लाखो वारकरी आणि त्यानंतर तुळजापुरात दर्शनासाठीसाठी भाविकांच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याचे दिसत आहे. त्यांच्या या दौऱ्यात पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत.