सोलापूरातील गणपती बाप्पांच्या मूर्ती निघाल्या कॅनडा, अमेरिका अन् थायलंडला
तीन हजार मूर्तींची मागणी : रंगकाम वेगात
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरात तयार होणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तींची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोलापूरात तयार होणाऱ्या गणेश मूर्तींना यंदा कॅनडा, अमेरिका आणि थायलंड या तीन देशांतून मागणी आली आहे. तीन देशांत मिळून तब्बल तीन हजार मूर्ती जाणार आहेत. या मूर्तींसह इतर मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे.
सोलापूरात गेल्या अनेक पिढ्यांपासून अतिशय सुबक, उत्कृष्ट गणेश मूर्ती तयार करणारे कलाकार आहेत. विशेष म्हणजे मूर्तीची मूळ रचना, त्यावरील दागिन्यांचे नक्षीकाम आणि इतर नक्षीकामही सोलापूरातच तयार केले जाते, असे श्री साई आर्ट्सचे अंबादास दोरनाल यांनी सांगितले.
गणपती बाप्पांच्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचे काम सोलापूरात वर्षभर चालते. सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून, देशभरातून तसेच जगातील अनेक देशांमधून सोलापूरातील गणेशमूर्तींना मोठी मागणी येत असल्यामुळे मूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर करावे लागते. यंदा ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी आता अवघा दीड महिना राहिल्यामुळे मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.
सोलापूरात सुमारे १७५ मूर्तिकार आहेत. या सर्वांकडे कामगारांची संख्या अंदाजे २ हजारांच्या घरात आहे. या मूर्तिकारांच्या माध्यमातून सोलापूरात दरवर्षी अंदाजे ४ ते साडेचार लाख मूर्ती तयार होतात. यंदा सगळ्याच ठिकाणहून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे मूर्तिकारांनी 'महाबातमी' ला सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठा पाऊस आल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील मूर्तीकाम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, सोलापूरातील मूर्तिकरांकडून मूर्ती विकत घेण्यासाठी दुकानदारांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट रंगकाम उत्कृष्ट नक्षीकाम आणि सुबकता यांमुळे सोलापूरातील मूर्तींना अधिक मागणी आहे.
-------------
दगडूशेठ, लालबाग, आजोबा अन् कसबा गणपती
सोलापूरात घरगुती गणपती मूर्ती, लहान मोठ्या मंडळांच्या गणपती मूर्तीं तयार होतातच. याशिवाय दगडूशेठ गणपती, लालबागचा राजा, कसबा गणपती, आजोबा गणपती अशा अनेक गणपतींच्या लहान मोठ्या आकारातील मूर्ती तयार करण्यात येतात. अशा मूर्तींना देखील मोठी मागणी आहे.
----------------
विडी कामगार महिला आता मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात
गेल्या काही वर्षांत विडी उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे विडी कामगार महिलांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यावर पर्याय म्हणून अनेक महिलांनी आता गणेश मूर्ती तयार करण्याचे काम शिकून घेतले आहे. या व्यवसायात कमी प्रमाणात का होईना आता विडी कामगार महिलाही आल्यामुळे त्यांना रोजगाराचे चांगले साधन उपलब्ध झाले आहे.