ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर यांची तीन दिवसीय प्रवचनमाला सोमवारपासून

श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन

ह.भ.प. चैतन्य महाराज देगलुरकर यांची तीन दिवसीय प्रवचनमाला सोमवारपासून

सोलापूर : प्रतिनिधी

श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे श्री ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठ उपासक व प्रवचनकार ह. भ. प. श्री चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन सोमवार २७ ते बुधवार २९ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश मानधनिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हुतात्मा स्मृती मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत ही प्रवचनमाला चालणार आहे. 'स महात्मा सुदुर्लभ: अर्थात म्हणोनी भक्तांमाजी रावो आणि ज्ञानिया तोचि' असा त्यांच्या प्रवचनाचा विषय राहणार आहे.

श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संत मोरारीबापू यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या संस्थेने स्थापनेपासून रक्तदान शिबिर, भूकंपग्रस्तांना मदत, सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत अशी विविध सामाजिक कार्ये केली आहेत. तर दा. का. थावरे यांच्या प्रेरणेने २००९ पासून श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या ज्ञानेश्वरीवरील प्रवचनाचे आयोजन श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्थापनेपासून अध्यक्ष राहिलेल्या गणेश मानधनिया आणि विश्वस्त सूर्यनारायण रघोजी यांचा सपत्नीक सत्कार बुधवार, २९ नोव्हेंबर रोजी श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करुन होणार आहे. सोलापूरकरांनी या प्रवचनमालेस उपस्थित रहावे आणि प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव श्रीकांत भुतडा यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष गणेश मानधनिया, सचिव श्रीकांत भुतडा, उपाध्यक्ष वेणुगोपाल तापडिया, विश्वस्त संजीव कुसुरकर, विश्वस्त ज्ञानेश्वर दिवटे, विश्वस्त विष्णुकांत मानधनिया आदी उपस्थित होते.