योग वेदांत समितीतर्फे महासंकीर्तन यात्रा भक्तिभावात

संस्था, संघटनांचा सहभाग

योग वेदांत समितीतर्फे महासंकीर्तन यात्रा भक्तिभावात

सोलापूर : प्रतिनिधी

संत श्री आसारामजी बापू प्रणित योग वेदांत सेवा समिती, सोलापूरतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त महासंकीर्तन पदयात्रा भक्तिमय वातावरणात झाली.

या महासंकीर्तन पदयात्रेत चिमुकल्यांनी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, नारद महर्षी, श्रीराम, श्री गणेश, श्रीकृष्ण, भारतमाता, राधा आदींची वेषभुषा करून आपला उत्साह दाखविला.

गोरक्षा विभाग, सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदूराष्ट्र सेना अशा अनेक संस्थांनी सहभाग नोंदवला. तसेच काही शैक्षणिक संस्था आपल्या संस्थेतील विद्यार्थी घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्याच बरोबर अनेक सामाजिक संस्थांचाही सहभाग लाभला. माजी पालकमंत्री, आमदार विजयकुमार देशमुखदेखील या पदयात्रेला सहभागी झाले होते. रस्त्यात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना योग वेदांत सेवा समितीतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला.  साधारणतः ५०० महिला साधक व पुरुष साधकांचा समावेश या पदयात्रेत होता.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुरु झालेली ही पदयात्रा पार्क चौक, सरस्वती चौक, लकी चौक, सावरकर मैदान, चौपाडमार्गे शिवस्मारक येथे समाप्त झाली.

गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी दिवसभर (ता.१३) संत श्री आसारामजी बापू आश्रम, मुळेगाव, अक्कलकोट रोड सोलापूर येथे भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत असे संयोजकांनी यावेळी सांगितले.

महाप्रसाद वाटपानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगीराज हरसुरे यांनी सर्व सहाय्यकांचे व सहभागी संस्थांचे आभार मानले.