ब्रेकिंग ! सोलापूर शिवसेनेला खिंडार ?

एकनाथ शिंदे गट सक्रिय

ब्रेकिंग ! सोलापूर शिवसेनेला खिंडार ?

पुरूषोत्तम कारकल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद सोलापूर येथे उमटू लागले आहेत. सोलापुरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि माजी पदाधिकाऱ्यांनी रविवारी पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट सोलापूर शिवसेनेला खिंडार पाडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच सोलापूर दौऱ्यात सोलापुरातील एकनाथ शिंदे गट सक्रिय झाल्याचे दिसून आले. त्यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असलेले महेश कोठे तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड त्याचबरोबर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, परिवहन समितीचे माजी सभापती तुकाराम मस्के आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरात भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनीष काळजे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगीही महेश कोठे, प्रथमेश कोठे वगळता ही मंडळी उपस्थित होती.

रविवारी जिल्हा शिवसेनेची सोलापूर शहरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना फुटणार नाही, शिवसेना अभेद्य आहे, शिवसैनिकांची निष्ठा मातोश्रीवरच कायम राहणार असा दावा केला. यानंतर काही वेळातच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला ऊत आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिवसेनेत उलथापालथ झाल्यानंतरही सोलापूरचा गड शाबूत ठेवण्यात सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना रविवारपर्यंत यश आले होते. मात्र माजी नगरसेवक, माजी शहरप्रमुख, माजी परिवहन समिती सभापती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे एकनाथ शिंदे गट सोलापूर शिवसेनेला खिंडार पाडणार असल्याची चर्चा नागरिकांसोबत शिवसेनेतही सुरू झाली आहे.
----------
मी राष्ट्रवादीतच राहणार - कोठे
सोलापूर महापालिकेचे राजकारणात  स्थायी समितीचे राजकारण असो किंवा विरोधी पक्षनेते पदाचे राजकारण असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दरवेळी मदत केली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच सोलापूर जिल्ह्यात येत असल्याने मी त्यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मला आजवर चांगली साथ दिली आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे असे महेश कोठे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.
--------
गेलेल्यांचा शिवसेनेशी संबंध नाही - बरडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटलेल्या मंडळींचा शिवसेनेशी संबंध नाही. महेश कोठे, अमोल शिंदे, हरिभाऊ चौगुले असे अनेक जण गेल्या वर्षा - दीड वर्षापासून पक्षाच्या कोणत्याही बैठकीस, उपक्रमास येत नव्हते. यातील अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेससोबत उघड उघड फिरत होते. राहिला प्रश्न तुकाराम मस्के यांचा. तुकाराम मस्के हे राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतरदेखील शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यामुळे तेही पक्षाशी एकनिष्ठ कधीच नव्हते. त्यामुळे आज गेलेल्या लोकांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक शिवसेनेच्या सोबतच राहतील, असा दावा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना केला.