सोलापूर जिल्ह्याच्या उत्कृष्ट कामांचा 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्वीकारला पुरस्कार
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’ आणि लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागरी सेवा दिनी 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचे हे १६ वे वर्ष आहे. आज विज्ञान भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन (DOPT) मंत्रालयांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय प्रशासकीय सुधारणा, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग, प्रधानमंत्री सचिवालयाचे सचिव डॉ. पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गुबा आणि केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव वी. श्रीनिवास हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशभरातील १६ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला. यामधे महाराष्ट्रतील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि २० लाख रूपये रोख असे आहे.
‘ऑपरेशन परिवर्तन’ मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे
‘ऑपरेशन परिवर्तन’ मुळे स्थानिकांच्या जीवनमान बदलाचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. ते म्हणाले, तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा यात सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा बसला व समूळ उच्चाटन झाले. स्थानिक लोकांच्या हाताला स्वंय रोजगाराची साधने उपलब्ध झाल्यामुळे ते अवैध दारू विक्रीपासून परावृत्त झाले.
असा आहे ‘ऑपरेशन परिवर्तन’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्याकरीता व त्याचे समूळ उच्चाटनासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ वर्ष २०२१-२२ मध्ये नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या उपक्रमास पोलीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीची ११७ ठिकाणे निश्चित करुन त्यातील गांवे जिल्ह्यातील पोलिस निरिक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक अधिका-यांना दत्तक देण्यात आली. सातत्यपूर्ण कारवाई, समुपदेशन, पुनर्वसन, जागृती या चार टप्यावर राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये अवैध हातभट्टी व्यवसाय करणारे लोकांना त्यांच्या या अवैध व्यवसायापासून परावृत करुन त्यांना इतर व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे, त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे हे मुख्य ध्येय होते. यादृष्टीने त्यांचे समुपदेशन केले गेले.
अवैध व्यवसायाची ठिकाणे नष्ट करुन हा व्यवसाय संपूर्णपणे मोडीत काढून सदर व्यवसाय करण्याची व्यक्तीची प्रवृती त्याचे मनातून मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. ज्याचा परिणाम म्हणून उपरोक्त प्रमाणे ७२६ व्यक्तींनी स्वत: चा पारंपारिक दारुचा व्यवसाय सोडून देऊन समाजामध्ये ताठ मानेने जगता येण्यासारखे व्यवसाय अंगिकृत केलेले आहेत. त्यांच्या या कामाची दाखल घेत त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.