महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटनेबाबत आ. प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

श्री सदस्य म्हणतात 'आम्ही स्वइच्छेने अन् स्वखर्चाने गेलो'

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमातील दुर्घटनेबाबत आ. प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

सोलापूर : प्रतिनिधी

खारघर येथे झालेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातील अनेक श्री सदस्यांना बळजबरीने नेण्यात आले, असा गंभीर आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. येथे झालेल्या १३ जणांच्या मृत्यूच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आ. शिंदे यांनी यावेळी केली. दरम्यान, श्री सदस्यांनी आम्ही स्वइच्छेने आणि स्वखर्चाने गेल्याचे सांगितले आहे.

१६ एप्रिल रोजी खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी १३ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. याचा काँग्रेस निषेध करत असल्याचे त्या म्हणाल्या. याबाबत विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन घ्यावे. महाराष्ट्र शासनातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्या तुलनेत ५ लाख रुपयांची मदत पुरेशी नाही. घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ही शिंदे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमास डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्यांना बोलावले असे सांगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि भर उन्हात कार्यक्रम घेण्याच्या अट्टाहासामुळे या ठिकाणी ही घटना घडली आहे असेही आ. शिंदे म्हणाल्या.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकांबाबत विचारले असता आ. शिंदे म्हणाल्या, कर्नाटकातील जनतेचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला निश्चित यश मिळेल. शासकीय यंत्रणांचा वापर करून काँग्रेसवर दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये भाजप शिवसेनेच्या बाजूने जनमताचा कौल नसल्यामुळे निवडणुका न घेण्याचे सरकारचे धोरण दिसून येत आहे. सोलापूर शहरातही प्रशासनावर धाक नसल्यामुळे आणि पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच विकासकामांना खीळ बसत आहे, असा आरोपही आ. प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला.

---------

आ. प्रणिती शिंदे यांचे आरोप :-

 #अनेक श्री सदस्यांना बळजबरी करून, भावनिक साद घालून खारघरला नेण्यात आले. 
# त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती.
# रुग्णवाहिकांचे आवाज होऊन देखील कार्यक्रम थांबवण्यात आला नाही.
# धर्माचे राजकारण करण्याची खेळी भाजप खेळत आहे.
# श्री सदस्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
-------------
श्री सदस्य म्हणतात 'स्वइच्छेने आणि स्वखर्चाने गेलो'

याबाबत 'महाबातमी न्यूज पोर्टल' ने श्री सदस्यांशी संपर्क केला असता ते म्हणाले, आम्ही स्वइच्छेने आणि स्वखर्चाने या कार्यक्रमास गेलो. आमच्यावर कोणीही कसलीही जबरदस्ती केली नाही, असे श्री सदस्यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना सांगितले.