सावधान ! महाराष्ट्राने पार केला एक लाख मृत्यूंचा आकडा
लॉकडाऊन संपला तरी निष्काळजीपणा नको
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने आज तब्बल एक लाखाचा आकडा पार केला. त्यामुळे अनेक शहरांत लॉकडाऊन संपला असला तरी निष्काळजीपणा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमांतर्गत ही आकडेवारी सोमवारी जाहीर केली.
महाराष्ट्रात आजवर एकूण ५८ लाख ३१ हजार ७८१ रुग्ण आढळले आहेत. यातील ७ जून पर्यंत तब्बल एक लाख १३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी २३३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाने एक लाख मृत्यूचा आकडा पार केला आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अंशतः तर काही ठिकाणी नियम, अटी घालून लॉकडाऊन पूर्णतः उठवण्यात आला आहे. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता प्रशासन पातळीवरून व्यक्त केली जात आहे. अशावेळी सर्वच नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे.
राज्यात आजवर ५५ लाख ६४ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.२५ टक्के इतके आहे. मात्र राज्याने पार केलेला एक लाख मृत्यूंचा आकडा नागरिकांची चिंता वाढविणारा आहे. तशातच राज्यात आज नव्याने १० हजार २१९ नव्या रुग्णांची नोंद झाली.
पहिल्या लाटेनंतर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक गर्दी केल्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची संख्या वाढल्याचे प्रशासन पातळीवरून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असताना लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट आणि होणारी गर्दी तिसऱ्या लाटेसाठी निमंत्रण ठरू नये याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.
------------------------------
नियमांचा नको अतिरेक
लॉकडाऊनमुळे गेल्या सव्वा वर्षापासून उद्योगधंदे, व्यवसाय जवळपास बंद आहेत. सतत व्यवसाय बंद असल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे अपेक्षित आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी करताना शिस्तीचा अतिरेक होऊ नये अशी अपेक्षा प्रशासन आणि पोलिसांकडून आहे.