विवेकानंद केंद्राचा वयम् प्रकल्प महाराष्ट्रासाठी गौरवास्पद

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी : वयम् वास्तूचे उद्घाटन

विवेकानंद केंद्राचा वयम् प्रकल्प महाराष्ट्रासाठी गौरवास्पद

सोलापूर : प्रतिनिधी

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी च्या विवेकानंद केंद्र वेदांतिक एप्लीकेशन ऑफ योगा अँड मॅनेजमेंट हा प्रकल्प सोलापूरचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. विवेकानंद केंद्रा तर्फे उभारण्यात आलेल्या वयम या वास्तूचे उद्घाटन शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

यावेळी व्यासपीठावर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णन, महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट, महाराष्ट्र प्रांत संचालक किरण कीर्तने उपस्थित होते. प्रारंभी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन झाले. यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचे काम केले. स्वामी विवेकानंद यांचे चरित्र घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंद केंद्र महान कार्य करत आहे. पूर्वोत्तर भारतात विधायक कामांसाठी मोठा विरोध होत असताना त्याला न जुमानता भारताला दूर होण्याच्या परिस्थितीपासून वाचविण्यात विवेकानंद केंद्राचा मोठा वाटा आहे.

विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णनजी म्हणाले, मनुष्य निर्माणाचे कार्य विवेकानंद केंद्र अखंडपणे करत आहे. विश्व टिकायचे असेल तर सनातन धर्म टिकला पाहिजे. त्यासाठी भारताने विश्वगुरू बनणे आवश्यक आहे. देश आणि धर्मासाठी काम करणे हेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे उद्दिष्ट असायला हवे. वयम् प्रकल्पाच्या माध्यमातून यादृष्टीने मोठे कार्य भविष्यात उभे राहील,असा विश्वासही विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. बालकृष्णनजी यांनी यावेळी व्यक्त केला.

विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट यांनी प्रास्ताविक केले माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
-----------
राज्यपालांनी दिली २५ लाखांची देणगी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विवेकानंद केंद्राच्या वयम् प्रकल्पास २५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान याची घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.