वारकऱ्यांचा संताप ! राज्यभर मतदानावर बहिष्कार

महापूजेला बाहेरील कोणीही नको

वारकऱ्यांचा संताप ! राज्यभर मतदानावर बहिष्कार

सोलापूर : प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाच्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावत महाराष्ट्र शासनाने कार्तिकी यात्रेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आगामी सर्व निवडणूकांतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय वारकऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती कार्तिकी यात्रा समन्वय समितीचे समन्वयक रामकृष्ण महाराज वीर यांनी महाबातमी ला दिली.

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्तिकी यात्रेवर बंदी घातली आहे. वारकरी संप्रदाय आणि जिल्हा प्रशासन यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत वारकऱ्यांनी नियम पाळून, प्रत्येक दिंडीत १० अशा संख्येने वारी करण्याचा प्रस्ताव दिला होता. वारकऱ्यांची मागणी नियमबाह्य नाही. त्यामुळे परवानगी न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी सगळ्या निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालतील असा इशारा देण्यात आला होता.

याबाबत वीर महाराज म्हणाले, "आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने सहकार्य केले आहे.  तसेच कार्तिकी यात्रेसाठीसुद्धा अत्यंत मर्यादित संख्येने यात्रा भरवण्याचा योग्य प्रस्ताव दिल्यानंतर शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा होती. शासन तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने  कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अत्यंत दुःखद अंतःकरणाने ही भुमिका जाहीर करत आहोत."

मतदान बहिष्काराची सुरुवात येत्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालून होणार आहे.

कार्तिकी वारीत पंढरपुरस्थित सर्व फडकरी महाराज मंडळींना भजन कीर्तनाचे नियम पार पाडावयाचे असल्याने हि कार्तिकी एकादशी झाल्यानंतर ज्या पदवीधर मतदार संघात निवडणूक आहे, त्या त्या ठिकाणी जाऊन मतदान प्रक्रीयेवर वारकरी, विठ्ठलभक्तांनी बहिष्कार टाकावा, मतदान करु नये असा प्रचार दौरा करण्यात येणार आहे, असेही शुक्रवारी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

या बैठकीस ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, ह.भ.प. संजय महाराज देहूकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प.भागवत महाराज चवरे, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे, ह.भ.प. रंगनाथ (स्वामी) महाराज राशिनकर, ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख, ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प.रामकृष्ण महाराज वीर आदी उपस्थित होते.
--------------------------------
...तर श्री विठ्ठलाची पूजाही स्थानिकांनीच करावी !
वारकरी संप्रदायाला इतके निर्बंध असतील तर कार्तिकी एकादशीची श्रीविठ्ठलाच्या महापुजेलाही बाहेरुन कोणीही न येता हि महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करावी अशी मागणीही यावेळी कार्तिकी यात्रा समन्वय समितीने केली आहे.

---------------

नियमित वाचा महाबातमी
संपर्क :- पुरुषोत्तम कारकल
९८६०८२२२८३