'कार्तिकी' वरून वारकरी आक्रमक
राज्यभर मतदानावर बहिष्काराचा इशारा
सोलापूर : प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे आषाढी यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता मद्यालये, सिनेमागृहे आदी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्रा तरी नियम - अटींसह होऊ द्यावी अशी भूमिका घेत वारकरी आक्रमक झाले आहेत. कार्तिकी यात्रा न झाल्यास पुढील सर्व निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा वारकरी कार्तिकी यात्रा समन्वय समितीने दिला आहे.
मंगळवारी कार्तिकी यात्रा समन्वय समिती आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यात याबाबत चर्चा झाली. समन्वय समितीत वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, श्री संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ. प.निवृत्ती महाराज नामदास, अखिल भाविक वारकरी महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ. प. सुधाकर महाराज इंगळे, कार्तिकी यात्रा समन्वय समितीचे समन्वयक ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर, ह.भ.प.भरत महाराज अलिबागकर, ह.भ.प. शाम महाराज उकळीकर यांचा समावेश होता. तर माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख हे यावेळी चर्चेत सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, "आषाढी यात्रेत दरवर्षी किमान १० लाख तर कार्तिकी यात्रेत ५ लाख येतात. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पाच लाखांची गर्दी होणे धोक्याचे ठरेल." कार्तिकी यात्रा समन्वय समितीने पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करावी. तेथून आलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. यानंतर अंतिम निर्णय होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले.
यावर कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला कार्तिकी यात्रेबाबत प्रस्ताव दिला. सर्व नियम पाळून बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक दिंडीत केवळ १० जण असतील, मठामध्ये अधिकाधिक ५० वारकरी सामाजिक अंतर पाळून निवास करतील अशा एकूण १० मुद्द्यांचा प्रस्ताव शासनाला दिला. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारीच्या प्रथेवर बंदी हा उपाय नसून यातून सुवर्णमध्य काढता येईल अशी भूमिका मांडली.
समस्त वारकऱ्यांची कळकळीची विनंती शासनाने नियम अटींसह मान्य करावी. अन्यथा वारकऱ्यांना पुढील प्रत्येक निवडणूकीत मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही कार्तिकी यात्रा समन्वय समितीने दिला आहे. त्यामुळे यंदा कार्तिकी यात्रेवरून वारकरी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
--------------
काय आहे वारकऱ्यांचा प्रस्ताव ?
१) कार्तिकी यात्रा निर्बंधाऐवजी निर्विघ्नपणे पार पडावी.
२) प्रत्येक वारकरी संप्रदाय मठात नियम पाळून किमान ५० वारकऱ्यांना सप्तमी ते पौर्णिमा मुक्कामास हवी परवानगी.
३) परगावच्या दिंड्यांमध्ये प्रत्येकी १० जणांनाच द्यावी परवानगी.
४) उघड्यावरील तात्पुरत्या निवासास प्रतिबंध हवा.
५) परंपरेचा अविभाज्य भाग असल्याने चंद्रभागा स्नानास परवानगी द्यावी.
६) एकादशीदिनी नगर प्रदक्षिणा करणाऱ्या फडाच्या दिंड्यांत २५ जणच नियम पाळून असावेत.
७) पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरास जाणाऱ्या दिंड्यांमध्ये प्रत्येकी १० च वारकरी असावेत.
८) महाद्वारकाला कमी संख्येत करावा.
९) वारकरी संख्या कमी असली तरी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून 'कोविड वॉरीयर्स' नेमून त्यांच्याद्वारे कोरोना नियमांबाबत प्रबोधन करावे.
१०) मंदिर परिसरात यात्रा काळात कोणतीही संचारबंदी लावू नये.