छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यास केला विरोध

नळदुर्गच्या किल्ल्यामध्ये झालेला गोंधळ व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यास केला विरोध

सोलापूर : प्रतिनिधी

नळदुर्ग येथील किल्ल्यामध्ये काही तरुण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देत असताना त्यांना एका व्यक्तीने विरोध केल्यानंतर तरुणांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याचा व्हिडीओ समाज माध्यमांत प्रचंड व्हायरल झाला आहे.

त्याचे झाले असे काही तरुण नळदुर्ग येथील किल्ल्यामध्ये गेले होते. यावेळी हे तरुण 'छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय', 'धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत होते. यावेळी एका व्यक्तीने घोषणादेण्यात विरोध केल्याचा आरोप करीत हे तरुण त्या व्यक्तीवर संतापल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

युवकांनी संतापून जाब विचारताच, 'या किल्ल्यावर चालुक्य, आदिलशाही, बहामनी, निजामशाही यांनी राज्य केल्याचे किल्ल्यातील फलकावर लिहले आहे. तिथे शिवाजी महाराजांचे नाव कुठेही नाही' असे तो माणूस म्हणाला.

'हा किल्ला महाराष्ट्रात येतो त्यामुळे आम्ही या किल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या घोषणा देणारच. तुम्हाला काय करायचे ते करा' असे या युवकांनी ठणकावून सांगितलेल्याचेही व्हिडीओत पहायला मिळत आहे.

'तुला सांगितलेली भाषाच कळेना...' असे त्या व्यक्तीचे म्हणताच, ' घोषणा द्यायची हे तुम्ही नका सांगू आम्हाला माहिती आहे', असे ठाम उत्तर त्या युवकांनी दिले. यावर तो माणूस चिडून 'नीट बोल... नीट बोल' असे म्हणत युवकांना दरडावताना व्हिडिओत दिसून येत आहे.

हा व्हिडिओ मंगळवारी समाज माध्यमांत प्रचंड व्हायरल झाला. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
------------------
घटना दुर्दैवी
नळदुर्ग किल्ला आम्ही संगोपनासाठी घेतला आहे. नळदुर्ग किल्ल्यातील घडलेली घटना दुर्दैवी आहे. त्या व्यक्तीचे म्हणणे अयोग्य आहे.
---- कफिल मौलवी, युनिटी मल्टीकॉन प्रा. लि., सोलापूर
---------------
किल्ल्याची जागा नव्हे अवघा देशच शिवरायांचा

नळदुर्गचा किल्ला स्वराज्यात होता किंवा नव्हता यावर घोषणा द्यायची की नाही हे ठरणार का ? नळदुर्ग किल्ल्याची जागाच नव्हे तर अवघा भारत देशच छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आहे. असा शिवद्रोह करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यापुढे जर असा प्रकार घडला तर संबंधितांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल.

--- महेश धाराशिवकर, विभागीय संघटक, भारतीय विद्यार्थी सेना