पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांच्या 'मायक्रो प्लॅनिंग' ने शहर मध्य ला पडले खिंडार ?

मोहन डांगरे आणि टीमने केली मतांची बेरीज

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांच्या 'मायक्रो प्लॅनिंग' ने शहर मध्य ला पडले खिंडार ?

सोलापूर : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजपा आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणायचाच असा चंग बांधलेल्या भारतीय जनता पार्टीने 'मायक्रो प्लॅनिंग' करून शहर मध्य मतदार संघातील मते खेचून आणण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते मोहन डांगरे यांनी शहर मध्य मतदारसंघात गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांपर्यंत संपर्क केला. आणि निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर मतांची बेरीज करत शहर मध्य मतदारसंघात अनेक ठिकाणी एकगठ्ठा असलेली मते भाजपाकडे वळविण्यात यश मिळवल्याचे दिसून आले.

मोहन डांगरे यांनी जानेवारी महिन्यात भटक्या विमुक्त समाजातील १५० जणांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत लावून शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या भटक्या विमुक्त जातीजमातीतील नागरिकांशी संपर्क सुरू केला होता. या भटक्या विमुक्त जाती जमातींचे नेतृत्व करणाऱ्या भारत जाधव यांना हेरून त्यांना भाजपच्या संपर्कात आणले. स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीपासून दूर राहिलेला हा समाज भाजपाशी जोडण्यात मोहन डांगरे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून यश मिळवले. कैकाडी समाजाचे नेते असलेल्या वसंत जाधव यांच्या साथीने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी आपलेसे केले. निवडणुक रंगात असतानाच भटक्या विमुक्त जातीजमातीच्या संस्थेचा सुमारे २० हजार जणांचा मेळावा या निवडणुकीतील शहर मध्य विधानसभा मतदार संघात टर्निंग पॉईंट ठरला. या मेळाव्यात नागरिकांनी दिलेल्या 'मोदी मोदी' च्या घोषणा भाजपासाठी फलदायी ठरणार हे तेंव्हाच निश्चित झाले.

गेल्या तीन वर्षांपासून आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या मोहन डांगरे यांनी विडी घरकुल परिसरात लोकसभा निवडणुकीत तेथील नागरिकांशी संपर्क साधत स्थानिकांना होणारा प्रचंड विरोध झुगारून त्यांना भाजपाच्या संपर्कात आणण्यात मोठी भूमिका बजावली. याशिवाय शहरातील वडार, लोधी, कोळी, हटगार विणकर अशा अनेक समाजांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः भेटी देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविले.

यंत्रमाग कामगार, कारखान्याचे मालक, विविध जाती समूहातील प्रभावशाली व्यक्ती, पेन्शनर्स नागरिक अशा समाजातील सर्व स्तरातील घटकांना सोबत घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मोहन डांगरे यांच्या टीमने शहर मध्ये प्रचाराचा धुराळा उडून दिला होता. सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसची ताकद खिळखिळी करण्यासाठी याचा मोठा उपयोग झाल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मोहन डांगरे आणि त्यांच्या टीमसह भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे परिणाम मतपेटीत बंद झाले आहेत. ४ जून रोजी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयाची खात्री भाजपाकडून व्यक्त होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपा मोठा विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवला तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मोहन डांगरे आणि त्यांच्या टीमने केलेल्या 'मायक्रो प्लॅनिंग' चा वाटा मोठा राहणार हे निश्चित ! अशी भावना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.