नारायण राणे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले,
भाजपची भूमिका केली स्पष्ट
सोलापूर : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मंगळवारी सकाळपासून राज्यातील वातावरण पेटले. राणे समर्थक आणि शिवसेना या दोघांकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होत असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी नारायण राणे यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष ठामपणे उभा असल्याची प्रतिक्रीया माध्यमांना दिली.
माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायण राणे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
मुख्यमंत्री पद हे महत्वाचे पद आहे. त्या पदाबद्दल, त्या पदावरच्या व्यक्तीबद्दल बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. वस्तुतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात. त्यामुळे एखाद्याचा संताप होणे स्वाभाविक आहे. परंतु तो वेगळ्या पद्धतीने निषेध करता आला असता. मात्र ज्या प्रकारे सरकार नारायण राणे यांच्यावर कारवाई करत आहे त्याचे समर्थन आजिबात केले जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजप राणे यांच्या सोबत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
सरकार जर बेकायदेशीशर असे वागत असेल तर भारतीय जनता पक्ष राणे यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपाने आता जाहीरपणे नारायण राणे यांची बाजू घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.