हिंदूराष्ट्राची स्थापना हेच एकमेव उत्तर

डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे प्रतिपादन

हिंदूराष्ट्राची स्थापना हेच एकमेव उत्तर

सोलापूर : प्रतिनिधी

गोहत्या, घुसखोरी, लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद, नक्षलवाद, पाकिस्तान-बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार अशा हिंदू धर्मावरील या सर्व आघातांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच एकमेव उत्तर आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित ‘एक कदम हिंदू राष्ट्र की ओर...’ या विशेष धर्मसंवादात बोलत होते.

ते म्हणाले, धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांच्या अभावामुळे देशात हिंदु समाज बहुसंख्य असूनही सतत मार खात होता. अशा वेळी हिंदु जगजागृती समितीचे प्रेरणास्त्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हिंदूंसाठी विविध माध्यमांतून धर्मशिक्षण देणे चालू करण्यात आले. यांतून हिंदु धर्माचरणी होत आहेत.

हे लक्षात घेऊन वर्ष २०१२ ते २०१९ या कालावधीत समितीने प्रतीवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनां’चे आयोजन केले. त्यामुळे पूर्वी अशक्य वाटणारे हिंदुसंघटन आता शक्य होत आहे, असेही डॉ. पिंगळे म्हणाले.
--------------------
आपत्काळातील जीवितरक्षण’ या ग्रंथमालिकेतील दोन ग्रंथांचेही प्रकाशन !

यावेळी सनातन संस्थेचे नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ आणि ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी समितीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेवगिरीजी महाराज यांनी आशीर्वादरुपी शुभसंदेश दिला. तर तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा खटला लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे संयोजक श्री. राहुल कौल, तसेच अनेक मान्यवर हिंदुत्वनिष्ठांचे शुभेच्छापर संदेश व्हिडिओद्वारे प्रसारित करण्यात आले.

यावेळी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले, ‘पूर्वी कोणीही उघडपणे नाटक, चित्रपट, जाहिराती यांतून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करत असे; मात्र समितीने त्याविरोधात सातत्याने आणि चिकाटीने लढा दिल्याने ४०० हून अधिक विडंबने रोखण्यात समितीला यश आले. 

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट म्हणाले की, सरकार प्रत्येक क्षेत्राचे खाजगीकरण करत असतांना देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का केले जात आहे ? महाराष्ट्रातील साडेचार लाख मंदिरांच्या सरकारीकरणाचा डाव समितीने लढा देऊन विफल केला. जोपर्यंत सर्व मंदिरे भक्तांकडे येत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. 

या वेळी सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रांतील दुष्पवृत्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने उभारलेल्या लढ्याची माहिती दिली.

हा परिसंवाद ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २७ हजार ८९३ लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर ६७ हजार ८८५ लोकांपर्यंत पोचला.
------------------