घर किंवा जागा घ्यायची आहे ? मग चला नॉर्थकोट मैदानावर !
घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'क्रेडाई एक्स्पो' ही सुवर्णसंधी
सोलापूर : प्रतिनिधी
स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रेडाई एक्सपो २०२२ ही सुवर्णसंधी आहे, असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली - उगले यांनी केले. नॉर्थकोट मैदानावर आयोजीत ४ दिवसीय 'क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२२' या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मनपा आयुक्त तेली - उगले यांच्या हस्ते झाले. क्रेडाई एक्स्पो २०२२ चे एसबीआय होम लोन्स हे बँकिंग पार्टनर आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष किशोर चंडक होते. यावेळी व्यासपीठावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव गुप्ता, क्रेडाईचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी, उपाध्यक्ष अभिनव साळुंखे, उपाध्यक्ष अभय सुराणा, सचिव आनंद पाटील, खजिनदार राजीव दिपाली, सविता दीपाली, सहसचिव सुमित कांकरिया, समन्वयक संकेत थोबडे उपस्थित होते.
प्रारंभी मनपा आयुक्त शीतल तेली - उगले यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून क्रेडाई एक्सपो २०२२ चे उद्घाटन झाले. आयुक्त तेली - उगले म्हणाल्या, "क्रेडाईच्या माध्यमातून नामांकित बांधकाम व्यावसायिक, विकसक, बँक असे सर्व घटक एकाच छताखाली आले आहेत. ही सोलापूरकरांच्या दृष्टीने अत्यंत चांगली बाब आहे. सोलापूर शहरातील बांधकाम परवाने, कर व इतर बाबींविषयी क्रेडाईने मागण्या व त्यावरील प्रस्ताव दिल्यास त्यावर चर्चा करून सकारात्मक मार्ग निश्चितपणे काढता येईल."
स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव गुप्ता म्हणाले, "इतर क्षेत्रांप्रमाणेच बांधकाम क्षेत्रही अर्थकारणाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. मुंबई, पुणे प्रमाणे सोलापूर देखील वेगाने वाढत आहे. गेल्या काही काळापासून मुंबई, पुणे यांसारख्या शहरांना विस्ताराच्या मर्यादा येत आहेत. त्याचवेळी सोलापूरात मात्र विस्ताराला मोठा वाव आहे."
क्रेडाईचे माजी अध्यक्ष किशोर चंडक म्हणाले, "जेथील बांधकाम व्यावसायिक चांगले काम करतात त्या गावाची प्रगती चांगली होते. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून क्रेडाई काम करते. त्यामुळे क्रेडाईच्या माध्यमातून घर घेतलेल्यांना आजवर कधीही नुकसान झालेले नाही." यावेळी इंद्रधनु या प्रकल्पासाठी बिल्डर टायअप लेटर देऊन आल्हाद आपटे यांचा सत्कार करण्यात आला.
क्रेडाईचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर क्रेडाईचे सचिव आनंद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी अविनाश बचुवार, राजेंद्र शहा, गुरुराज यल्लटी, जयंत होले, माऊली झांबरे, अभिषेक राव, उमेश लोळगे, प्रमोद साठे, जयेश पटेल, संजय पटेल, आल्हाद आपटे, अभयकुमार एडके, विजय कटारे, केदार बिराजदार, प्रमोद हिंगे, रणजीत शहा, चंद्रशेखर अक्कलकोटे आदी उपस्थित होते.
----------
सोलापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन
क्रेडाई एक्स्पो २०२२ मध्ये एकूण ४० स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून प्लॉट, फ्लॅट्स, बंगले, रो हाऊसेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच अनेक वित्तीय संस्था यांच्याकडून संबंधित माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहितीही देण्यात येत आहे. सोमवार दि. १२ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असून सोलापूरकरांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन क्रेडाईतर्फे करण्यात आले आहे.