महाराणी ताराबाईंनी चालविला श्री शिवछत्रपतींचा प्रजाहितदक्षतेचा वारसा

राजेंद्र घाडगे : शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

महाराणी ताराबाईंनी चालविला श्री शिवछत्रपतींचा प्रजाहितदक्षतेचा वारसा

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू प्रजेचे कल्याण होता. श्री शिवछत्रपतींनी दिलेला प्रजाहितदक्षतेचा हा वारसा महाराणी ताराबाई यांनी समर्थपणे चालविला, असे प्रतिपादन राजेंद्र घाडगे (सातारा) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टतर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प राजेंद्र घाडगे यांनी सोमवारी हि. ने. वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात गुंफले. व्याख्यानमालेचे हे २७ वे वर्ष आहे. 

'महाराणी ताराबाई वाटचाल आणि राजनैतिक धोरण' असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी व्यासपीठावर शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे कार्यवाह डॉ. गिरीष चंडक, संयोजक किशोर चंडक, मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. नरेंद्र काटीकर उपस्थित होते.

वक्ते श्री. घाडगे म्हणाले, माहेरच्या मोहिते घराण्याकडून झालेले संस्कार आणि बालपणापासूनच हिंदवी स्वराज्याचा पाहिलेला कारभार यामुळे महाराणी ताराबाई यांना नकळतपणे राज्यकारभाराचे उत्तम धडे मिळाले. छत्रपति श्री संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून अतिक्रूर हत्या झाल्यानंतर स्वराज्यावर निर्माण झाले. हे संकट पेलून औरंगजेबाला २७ वर्षे झुंजत ठेवण्यात मराठेशाहीला आलेल्या यशात महाराणी ताराबाईंचा वाटा मोठा आहे. छत्रपति श्री शिवरायांचा प्रभाव महाराणी ताराबाईंवर होता. त्यांची गुण कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत शेवटपर्यंत महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची अस्मिता  जपली, असेही श्री. घाडगे यांनी सांगितले.

डॉ. अर्जुन व्हटकर यांनी परिचय करुन दिला. ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी सूत्रसंचालन तर वंदना कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
-----------
अभ्यासक गोविंद काळे यांचे आज व्याख्यान

व्याख्यानमालेचा समारोप आज अभ्यासक गोविंद काळे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन' या विषयावर ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टने केले आहे.