होटगी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू
महाबातमी चा पाठपुरावा

सोलापूर : प्रतिनिधी
रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या होटगी रस्त्याची डागडुजी अखेर गुरुवारी सुरू करण्यात आली. याबाबतचे वृत्त बुधवारी महाबातमी वर प्रसिद्ध करण्यात आले होते.
विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या खाली ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पुलाचे खोदकाम न करता ही ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. हे काम करताना पुलावरील रस्ता खचण्याची शक्यता असल्याने हा पूल २० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.
या रस्त्याला पर्याय म्हणून महावीर चौकातून पत्रकार भवनच्या दिशेने जाणारी जड वाहने होटगी रस्ता, जुळे सोलापूर येथील रेल्वे पूल, डी मार्ट, प्राधिकरण रस्ता, अत्तार नगरमार्गे सैफुल अशी जात आहेत. ही वाहने येथून सोडत असताना सोलापूर महानगरपालिकेने वाहनधारकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
महावीर चौक ते सैफुल या मार्गावर खड्डे पडल्यामुळे अपघातांची शक्यता आहे. यातील काही खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले. महाबातमीने या धोकादायक बनलेल्या रस्त्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र अद्याप अनेक खड्डे कायम आहेत. हे खड्डेदेखील लवकरात लवकर बुजवावेत. तसेच या मार्गावर आणि पत्रकार भवन ते रेल्वे बोगदामार्गे विजयपूर रस्ता या मार्गावर पथदिव्यांची सोय करावी अशी मागणी होत आहे.
-------------------