गुंठेवारी आणि रेशन धान्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आ. विजयकुमार देशमुख यांची सभागृहात मागणी
शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील गुंठेवारी आणि रेशन धान्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी विधिमंडळ सभागृहात केली.
आ. देशमुख म्हणाले, सोलापूर शहरातील गुंठेवारीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मोजणी झाल्याशिवाय बांधकाम परवानगी मिळत नाही. तसेच यामध्ये मोजणी शुल्क अधिक असण्याच्या समस्येबरोबरच अनेक जाचक अटी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. ज्याप्रमाणे पुण्याच्या गुंठेवारीच्या प्रश्नाबाबत शासनाने बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे, त्याप्रमाणे सोलापूर शहराच्या गुंठेवारीच्या प्रश्नाबाबतदेखील बैठक लावून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केली.
आ. देशमुख यांनी यावेळी शहरातील अनेक रेशन दुकानात शेकडो केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार केली. कार्डधारक दुकानात गेल्यानंतर त्यांना शासनाकडून अद्याप धान्य आले नसल्याचे सांगण्यात येते. हा प्रश्न त्वरित सोडवावा असेही माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी शासनाला सांगितले.
शहराचे दोन महत्त्वाचे प्रश्न आ. देशमुख यांनी शासन दरबारी मांडल्यानंतर आता या मागण्यांवर शासन काय निर्णय करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.