योगी आदित्यनाथ यांनी घडविला इतिहास
काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे गौरवोद्गार
सोलापूर : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचामान योगी आदित्यनाथ यांना मिळाला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आशीर्वाद सर्व श्रेष्ठ असतो. योगी आदित्यनाथ यांना आशीर्वादाबरोबरच देवाची कृपा झाली आहे. त्यांनी इतिहास घडविला आहे, असे गौरवोद्गार काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले.
नुकत्याच जाहीर झालेल्या उत्तर प्रदेश निवडणूकीच्या निकालानंतर काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी संदेश दिला आहे. काशीतील विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे भगवान विश्वनाथ यांची कृपा त्यांच्यावर झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी केलेली विकासकामे आणि त्यांच्यात भिनलेला राष्ट्रवाद यामुळे ते सर्वप्रिय झाले आहेत. योगीजी मूलतः गोरखपुर मठाचे महंत असून सर्वसंगपरित्यागी आहेत. वडिलांचे निधन झाले असतानाही अंत्यसंस्काराला न जाता कोव्हिड रुग्णांच्या सेवेत ते मग्न झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते आपल्या आईलाही भेटले नाहीत. अशाप्रकारे परिवार मोहातून ते पूर्णतः मुक्त आहेत. जनहिताला त्यांनी प्राधान्य दिले आहे. जनतेलाच त्यांनी मायबाप मानले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश होईल यामध्ये तिळमात्र शंका नाही, असेही काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले.
प्रत्येक राज्याला योगींसारख्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. त्यानंतर संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन भारताची सर्वार्थाने प्रगती होईल असेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.