लता मंगेशकरांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला होता सोलापूरात !
सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद आठवण !
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी सोलापुरात झाला. याचा सोलापूरच्या नागरिकांना अभिमान आहे. सरस्वती चौकजवळील एका बंगल्याच्या मोकळ्या जागेत झालेल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात लतादीदींनी खंबावती रागातील चीज व दोन नाट्यगीते सादर करून आपल्या गानकलेचा ठसा उमटविला. 'वाहवा', 'बहोत अच्छे' ची बरसात होऊ लागली. या कार्यक्रमाचे वर्णन करताना मूळचे सोलापूरचे प्रसिद्ध बासरीवादक कै. अरविंद गजेंद्रगडकर यांनी एका लेखात लिहिले आहे की, एके रात्री मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची रागदारीची आणि नाट्यसंगीताची मैफल कुणीतरी सोलापुरात ठरवली होती. 'गाण्याची साथ लता मंगेशकर' असे लिहिले होते. तिकीट होते फक्त आठ आणे. मास्टर दीनानाथ यांना बघण्यासाठी अनेक जण आले होते. पडदा उघडला दीनानाथ यांच्या मागे काटकोळी पण तेजस्वी डोळ्यांची लता तंबोरा घेऊन बसली होती. या कार्यक्रमात दीनानाथ यांचा आवाज लागत नव्हता. ते विलक्षण थकलेले दिसत होते. त्यामुळे त्यांचा आवाज नीट लागत नव्हता. एकदोन रागातल्या चिजा व एक नाट्यपद त्यांनी कसेबसे सादर केले. प्रयत्न करूनही त्यांचा आवाज वर जाईना. ते बाजूला झाले अन् लताला पुढे यायची खूण केली. आणि म्हणाले, आता हिचे गाणे ऐका. लता सरसावून बसली आणि तिने पहिलाच स्वर असा लावला, की ते सगळे मरगळलेले सभागृह सोनेरी चैतन्याने झगमगु लागले. दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आवाज म्हणजे काय असतो, याचा सर्वाना घडलेला तो साक्षात्कार होता. थरारून टाकणारा क्षणात दिव्यत्वाचे दर्शन घडवणारा सुरेल, सर्वांगसुंदर, सोनेरी साक्षात्कार ! मघाशी एवढीशी दिसणारी चिमुरडी लता आता आभाळाहून मोठी दिसत होती. तो दिवस, स्वरानुभव सर्वांच्या अंतकरणावर कायमचा कोरला गेला.
सोलापूर महानगरपालिकेतर्फे १९ फेब्रुवारी १९९४ रोजी पार्क मैदानावर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील व तत्कालीन महापौर मनोहर सपाटे यांच्या उपस्थितीत फेटा बांधून, शाल व पुष्पहार घालून तसेच चांदीच्या करंडकात मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला या गाण्याचे एका कडवं सुरेल आवाजात गाऊन दीदींनी या कार्यक्रमाचा समारोप केला. टाळ्यांचा कडकडाट झाला हा कार्यक्रम पाहण्याचे भाग्य आम्हा पत्रकारांना लाभले.
साभार - जेष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी