बीआरएसच्या माध्यमातून केवळ एका कुटुंबाचे भले !
तेलंगाणाच्या जनतेला सोडले वार्यावर : फडणवीस ४ राज्यात २२ प्रचारसभा आणि रोड शो
सोलापूर : प्रतिनिधी
तेलंगणातील बीआरएस सरकारने केवळ एका कुटुंबाचे भले केले. प्रचंड भ्रष्टाचारातून घर भरले आणि जनतेला वार्यावर सोडून दिले. त्यामुळे तेलंगणाचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी भाजपालाच मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केले.
तेलंगणातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या आज देवरकोंडा, पालाकुर्ती आणि नरसामपेट मतदारसंघात रोड शो आणि प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तेलंगणाने भ्रष्टाचार, दुराचाराची १० वर्ष अनुभवली आहेत. तेलंगणाचे सरकार केवळ एका कुटुंबासाठी काम करते आहे. एका कुटुंबाला रोजगार मिळाला आणि त्यांचेच केवळ भले झाले. बीआरएस आणि काँग्रेस हे एकच आहेत. ते सोबत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवू पाहत आहेत. त्यामुळे आता केवळ भाजपालाच निवडून द्या.
भाजपा सत्तेत आल्यानंतर आतापर्यंतच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करुन दोषी आढळणार्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. तेलंगणामध्ये भाजपा ओबीसी मुख्यमंत्री देणार आहे. धर्माच्या आधारावर देण्यात आलेले आरक्षण बंद करुन ते एससी, एसटी, ओबीसींना देण्यात येईल. घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर ती २१ वर्षांची होताच तिला २ लाख रुपये देण्यात येईल. गरिबांना आवास पट्टे देण्यात येईल.
तेलंगणाला जेव्हा पाण्याची गरज होती, तेव्हा आम्ही पाणी दिले. मेडिगट्टा प्रकल्पाला मदत केली. पण, त्यातही इतका भ्रष्टाचार झाला की तीनच वर्षांत त्याला तडे गेले. संपूर्ण पैसा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या तिजोरीत टाकला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
४ राज्यात २२ सभा/रोड शो
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ८ ते ९ दिवस विविध राज्यात प्रचार केला. १८ सप्टेंबर आणि १० तसेच १५ नोव्हेंबर या काळात त्यांनी मध्यप्रदेशात धार, इंदोर, महू, बुरहानपूर, पांढुर्णा, सौंसर इत्यादी ठिकाणी प्रचार केला. ३० ऑक्टोबर रोजी छत्तीसगडच्या दौर्यावर असताना धमतरी, रायपूर येथे रोड शो आणि प्रचारसभा घेतला. १४ सप्टेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या दौर्यावर असताना त्यांनी केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर, सांगानेर, आदर्शनगर येथे एकूण ७ सभा घेतल्या. तेलंगणात त्यांनी २१ आणि २८ नोव्हेंबर रोजी डोमलगौडा, हैदराबाद येथे रोड शो घेतले, तर नरसामपेट, देवलकोंडा, पालाकुर्ती येथे सभा आणि रोडशो केले.