कोरोना लस देण्यास सुरुवात झाली हो !
'गो कोरोना गो' म्हणत लसीकरणास प्रारंभ
सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोरोना लसीकरणास आज (शनिवारी) प्रारंभ झाला. 'गो कोरोना गो' म्हणत शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ८ केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ झाला.
शासकीय रुग्णालयात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत
डॉ. वैशंपायन महाविद्यालयाच्या केंद्रावरील लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल यांनी पहिली लस घेतली. त्यांना कोवैक्सीन लस देण्यात आली. त्यांना लस देताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
ज्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली त्यांचे तापमान, प्लस तपासून, ओळखपत्राची खातरजमा करून आत सोडण्यात येत होते. संबंधित व्यक्तीला टोकन देऊन त्यावर आत आलेली वेळ, लस दिलेली वेळ आणि बाहेर पडण्याची अचूक वेळ लिहून ते टोकन जमा करून घेण्यात येत होते. संबंधित व्यक्तीकडून संमतीचा एक छापील अर्जही भरून घेण्यात आला.
लस दिल्यानंतर त्याची माहिती तत्काळ ऑनलाइन माध्यमातून शासनाकडे पाठविण्याचे नियोजनही करण्यात आले होते.
---------
अर्धा तास निरीक्षणाखाली
लस दिलेल्या व्यक्तीला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. लस दिल्यानंतर काही त्रास होतोय का हे पाहूनच बाहेर सोडण्यात येत होते. अधिकची काळजी म्हणून ६ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक आणि बी ब्लॉक येथे अतिदक्षता विभागातील ५ खाट तयार ठेवण्यात आले होते.
-------
२८ दिवसांनी पुन्हा एकदा लस
कोरोनावरील लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आज लस दिल्यानंतर त्याच व्यक्तींना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
------------
पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ११०० लसी देण्याचे काम सुरू झाले. सोलापूर शहरातील दाराशा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी सहकारी रुग्णालयात तर ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय- अक्कलकोट, ग्रामीण रुग्णालय- बार्शी, उपजिल्हा रुग्णालय- करमाळा, उपजिल्हा रुग्णालय- अकलूज, ग्रामीण रुग्णालय - मंगळवेढा, उपजिल्हा रुग्णालय - पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय - सांगोला, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय - कुंभारी येथे लस देण्याचे काम सुरू झाले.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल.
लसीकरणासाठी 599 लसटोचक नियुक्त करण्यात आले असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाच जणांचे पथक असणार आहे. तसेच एक निरीक्षक आणि एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन मॅनेजमेंट ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोवैक्सीन लस मिळत आहे.
------------
नियमित वाचा महाबातमी न्यूज पोर्टल
पुरुषोत्तम कारकल
ताज्या बातम्या आणि अपडेट्स मिळवण्यासाठी हा वॉट्स एप क्रमांक ग्रुपमध्ये ऍड करा.
९८६०८२२२८३