केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल मंगळवारी सोलापूरात

सोलापूरकरांतर्फे होणार नागरी सन्मान : मारवाडी समाज संमेलन

केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल मंगळवारी सोलापूरात

सोलापूर : प्रतिनिधी

केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सम्राट चौकातील महेश गार्डन येथे मारवाडी समाज संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांचा सोलापुरातील सर्व राजस्थानी संस्थांतर्फे नागरी सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया आणि उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांचा मारवाडी समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तसेच हर्षद कांकरिया, मनीष मेहता, विशाल वर्मा, अनिल पटवारी, जगदीश भुतडा, लक्ष्मीकांत तापडिया, गोपाल दायमा, कृष्णकांत दायमा यांचा मारवाडी युवा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेले बदल आणि मोदींची गॅरंटी' या विषयावर केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर श्री. मेघवाल हे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांचे दर्शन घेणार असून सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादनही करणार आहेत.

महेश गार्डन येथील कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीनिवास दायमा यांनी याप्रसंगी केले. या पत्रकार परिषदेस उद्योजक बाबूभाई मेहता, शहर भाजपाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, हर्षल कोठारी, कल्पेश मालू, अनुपम खंडेलवाल, राकेश सोनी, आनंद शर्मा, विक्रम संकलेचा उपस्थित होते.