नव्या नियुक्त्यांमुळे भाजपमध्ये उत्साह

उदयशंकर पाटील, मनीष देशमुख, नरेंद्र काळे अन् नागेश वल्याळांसह अनेकांना संधी

नव्या नियुक्त्यांमुळे भाजपमध्ये उत्साह

सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश भाजपने जाहीर केलेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या यादीत सोलापूरला डावलले असले तरी विशेष निमंत्रित सदस्य निमंत्रित सदस्य आणि प्रदेश कार्यकारणीत मात्र काही जणांची वर्णी लावली आहे. उदयशंकर पाटील, मनीष देशमुख, नरेंद्र काळे, शहाजी पवार, नागेश वल्याळ यांच्यासह अनेक जणांची वर्णी लागल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या विशेष निमंत्रितांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्यासह सोलापुरातील माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र मिरगणे, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, केशवराव पाटील तसेच भारतीय जनता पार्टीत नव्यानेच दाखल झालेले उदयशंकर पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्याच्या निमंत्रित सदस्यांच्या यादीत माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, गजानन भाकरे, संजय खिलारे, स्वराली बोबडे, अनुजा कुलकर्णी, स्मिता भावे, दीपक चव्हाण, माऊली हळवणकर, आप्पासाहेब देशमुख यांची वर्णी लागली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये सोलापूर शहरातून माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे तर सोलापूर ग्रामीणमधून माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे यांना स्थान देण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीने केलेल्या या नव्या नियुक्त्यांमुळे पक्षामध्ये उत्साह संचारला आहे. भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले उदयशंकर पाटील यांचा कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. पक्षप्रवेश झाल्यानंतर पक्षाकडून योग्य दखल घेण्याच्या प्रतीक्षेत कार्यकर्ते होते. त्यामुळे भाजपच्या प्रदेश विशेष निमंत्रितांच्या यादीत उदयशंकर पाटील यांचा समावेश केल्याने उदयशंकर पाटील यांचे भाजपमधील स्थान आणखी बळकट झालेले दिसून येत आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले मनीष देशमुख यांची वर्णी प्रदेशाच्या निमंत्रितांच्या यादीत लावण्यात आली आहे. सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर विधानसभेच्या ग्रामीण भागातही मनीष देशमुख यांचा प्रभाव आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीमुळे पक्ष विस्ताराला बळकटी मिळणार आहे.

रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेले हिंदुत्वनिष्ठ आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ अशी कार्यकर्त्यांमध्ये प्रतिमा असलेले मनपाचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्याकडे पक्षाचे दुर्लक्ष झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र मध्यंतरीच्या काळात ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने नरेंद्र काळे यांना पुन्हा प्रवाहात घेतले आहे. नरेंद्र काळे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना आहे. माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शंकर वाघमारे, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, अनुजा कुलकर्णी, स्मिता भावे यांनाही प्रदेश निमंत्रितांच्या यादीत घेण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही यादी भाजपच्या निवडणुकीच्या तयारीचे द्योतक मानले जात आहे.