शहर भाजपात उद्या राजकीय भूकंप ?
कोण करणार काँग्रेसमध्ये प्रवेश ?
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीमध्ये उद्या (रविवारी) राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या तब्बल ३३ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा.अशोक निंबर्गी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
रविवारी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात काँग्रेसचा निर्धार महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. या महामेळाव्यात भाजपचे प्रा. निंबर्गी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रा. निंबर्गी पक्षातील घडामोडींमुळे वैतागल्याचे बोलले जात होते. मात्र शनिवारी प्रा. अशोक निंबर्गी यांनी एक पत्र भाजपमधील सहकाऱ्यांना उद्देशून सार्वजानिक केले. यात त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या महामेळाव्याच्या पूर्व संध्येला हे पत्र व्हायरल झाल्याने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली.
काय म्हणाले प्रा. अशोक निंबर्गी आपल्या पत्रात ? वाचा -
प्रिय सहकारी मित्रानो नमस्कार,
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेने आपण सर्वजण बांधले गेलो आहोत, गेल्या ३३ वर्षांपासून मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. पक्षातील माझ्या कामाची सुरवात ज्यांनी भाजपा जनसामान्यात रुजवली अशा स्व. लिंगराज वल्याळ यांच्यापासून झाली. या प्रदीर्घ प्रवासात स्व. वल्याळ साहेबांबरोबर आदरणीय किशोरजी देशपांडे साहेब, आदरणीय प्रभाकरजी जामगुंडे साहेब, आदरणीय दत्तात्रय गणपा, रामचंद्र जन्नू साहेब , आदरणीय श्रीहरीजी म्यॅकल, प्रा. मोहीनीताई पतकी, श्री. अशोकजी कटके, चन्नवीर चिट्टे, स्व.गोपीकिशनजी भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. ज्या की माझ्या राजकीय यशस्वीतीतेत खूप मोलाच्या ठरल्या. या कालावधीत अनेक जीवाभावाच्या मित्रांची ओळख झाली आणि त्यांच्या पाठींब्याने मला मिळालेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आली. संघटनेतील सर्वोच्च पद म्हणजे अध्यक्षपद या पदावर असताना मी नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये राहून त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीत विद्यमान नेतृत्वाला हे मान्य झाल नाही. त्यामुळे शहर भाजपातील अंतर्गत गटबाजील वैतागून मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या कालावधीतही मी पक्षाशी जोडून राहण्याचा प्रामाणीक प्रयत्न केला. परंतु गटबाजीच्या सुभेदारीमुळे पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांची एक फळी पक्षापासून दूर ठेवण्याचाच प्रामाणीक प्रयत्न केला गेला. त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची घुसमट होवू लागली. दुर्दैवाने या सर्व प्रकाराकडे लक्ष वेधण्याचा वेळोवेळी प्रयत्न करून देखील कोणत्याही पातळीवरच्या नेतृत्वाने याची दखल घेतली नाही आणि भविष्यात ती घेणार पण नाहीत याची खात्री पटल्याने मी अत्यंत जड अंतःकरणाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. बंधूंनो, अनेक वर्षांचा ऋणानुबंध तोडण्याचं दुःख काय असतं, हे मी आज अनुभवतो आहे, परंतु वातावरणच अस तयार केल जातं की तुम्ही स्वतःहून बाहेर पडावं. असो. नाईलाज आहे, माझी घुसमट खूपच वाढल्याने मी हा निर्णय घेतोय. ही परिस्थिती अशीच राहीली तर भविष्यात अनेक कार्यकर्ते असाच निर्णय घेतील. याचे प्रत्यंतर सर्वांना लवकरच येईल. पक्षाचे काम करीत असताना कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मोठ्या मनाने मला माफ कराल ही अपेक्षा. पक्षीय ऋणानुबंध संपले तरी व्यक्तिगत जीवनात कौटुंबिक ऋणानुबंध कायम राहतील या अपेक्षेसह थांबतो, धन्यवाद !
आपला स्नेहांकित -
प्रा. अशोक निंबर्गी, माजी शहर अध्यक्ष, भाजपा सोलापूर.
प्रा. अशोक निंबर्गी यांनी जाहीर केलेल्या या पत्रामुळे भाजपात अस्वस्थता पसरली आहे. उद्या काँग्रेसच्या महामेळाव्यात कोणत्या घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
--------------
अद्याप कोणताही निर्णय नाही - प्रा. निंबर्गी
मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे हे खरे आहे. मात्र मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे अद्याप निश्चित नाही. याबाबत मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहे. असे
भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.
(शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताची स्थिती)