धक्कादायक ! सोलापुरात सापडले १२ बांगलादेशी घुसखोर
कुठे ? : शहर पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्तपणे कौतुकास्पद कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात तब्बल १२ बांगलादेशी घुसखोर पकडल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अवैधपणे भारतात प्रवेश करून सोलापुरात येऊन राहणाऱ्या या बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची कौतुकास्पद कामगिरी सोलापूर शहर पोलिसांनी केली आहे.
अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील श्री जगदंबा महिला रेडिमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी संस्था अंध व अपंग कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था इआरटी चौक एमआयडीसी या ठिकाणी काही बांगलादेशी घुसखोर अवैधपणे वास्तव्यास आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री उशिरा संयुक्तपणे छापा टाकून १२ बांगलादेशी घुसखोरांना पकडले.
त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशी जन्म दाखल्यांच्या छापील प्रती, बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली. या १२ बांगलादेशी घुसखोरांनी भारतात कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी कागदपत्राशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून भारतात बनावट आधार कार्ड बनवून वास्तव्य सुरु केले होते. पोलिसांना याचा सुगावा लागताच एमआयडीसी पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून या घुसखोरांना ताब्यात घेतले आहे.
नासिर सरकार मो. बदी उज्जमान (जि. नाटोर, बांगलादेश), मोहम्मद नजीरउल्ला इस्लाम (जि. भोगुर, बांगलादेश), मोहम्मद मिजानुर रोहमन (नेत्रकोना, बांगलादेश), बाबुमिया सुलतान (शरीयतपूर बांगलादेश), शफिक रशीद मोडल (ढाका, बांगलादेश), मोहम्मद रहुल आमीन खलील फोराजी (रावगा, बांगलादेश), इम्रान नूर आलम हुसेन (शरीयतपूर बांगलादेश), मोहम्मद हजरतअली पोलाश (बो. बोगुरगा राजशाही बांगलादेश), मोहम्मद हजरतअली पोलाश (बुगुरा
बांगलादेश), मोहम्मद सोबेल जावेदअली (ढाका, बांगलादेश), अलाल नूर इस्लाम मियां (बांगलादेश), मोहम्मद अलीन हनीफ बेफिरी (बांगलादेश) यांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्यावर भारतीय पारपत्र अधि १९५०, परकीय नागरिक आदेश १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्रप्रसाद वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे, सुशील गायकवाड, अविनाश डिगोळे, समाधान गंजे, पोलीस कॉन्स्टेबल अमरसिंग शिवसिंगवाले, स्वाती घाटे, पाटील आणि दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी मिळून केली.