अरे व्वा ! श्रीराम, श्रीकृष्णांप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर होणार कथा

सोलापुरात प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांची होणार कथा : हिंदुस्थानातील पहिलाच उपक्रम !

अरे व्वा ! श्रीराम, श्रीकृष्णांप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर होणार कथा

सोलापूर : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांशी संपर्क करून  हजारो सोलापूरकरांना छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ऐकण्यासाठी आणून ही कथा यशस्वी करण्याचा निर्धार रविवारी झालेल्या शिवप्रेमींच्या बैठकीत झाला.

समस्त हिंदू समाजातर्फे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज कथा १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान सोलापुरात होणार आहे. त्या कथेच्या अनुषंगाने शहरातील शिवप्रेमींची तयारीची बैठक रविवारी सम्राट चौक येथील विकास सहकारी बँकेच्या सभागृहात झाली.

प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सल्लागार समिती सदस्य आणि विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी मार्गदर्शन केले.

श्री. मिणीयार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कथा १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या काळात होणार आहे. कथेच्या पहिल्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

हेमंत पिंगळे म्हणाले, शोभायात्रेमध्ये पारंपारिक मर्दानी खेळ, पारंपरिक वाद्ये यांचा समावेश राहणार आहे. भारतीय संस्कृतीतील पेहराव करुन विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच समस्त हिंदू समाज बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे.

या बैठकीप्रसंगी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, अनंत जाधव, संजय साळुंखे, शशी थोरात, महेश धाराशिवकर, श्रीशैल बनशेट्टी, बिज्जू प्रधाने, रंजीता चाकोते, संपदा जोशी, प्रियदर्शन साठे, अश्विन कडलासकर, निलेश कांबळे, रवि गोणे, सुधीर बहिरवाडे, दत्तात्रय वानकर, माजी नगरसेवक विनोद भोसले,  सुरज पाटील, वैभव गंगणे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विनोद रसाळ, अंबादास गोरंटला, प्रताप चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, चन्नवीर चिट्टे, संजय शिंदे, सुदीप चाकोते, राजाभाऊ काकडे, राजाभाऊ माने, संदीप महाले, यशवंत रसाळे, आनंद मुस्तारे, सागर आतनुरे, संदीप काशीद, विजय घुले, दादा गांगर्डे, प्रभुराज मैंदर्गीकर, संदीप जाधव, सतीश शिरसुला, नीता आकुडे, सुरेखा बावी, गणेश डोंगरे, विनोद केंजारल, विजय पोखरकर, सागर हिरेहब्बू आदी उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थानातील पहिला उपक्रम 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आजवर कथा, कादंबऱ्या, ग्रंथ, काव्ये लिहिली गेली परंतु श्रीराम कथा श्री भागवत कथेप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर कथा करण्याचा संपूर्ण हिंदुस्थानातील हा पहिलाच उपक्रम आहे.