आमदार विजयकुमार देशमुख यांना धक्का
भाजपाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
सोलापूर : प्रतिनिधी
भाजपाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी गुरुवारी शहर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त सधत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे शहर उत्तर विधानसभेचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
गुरुवारी दुपारी पती श्रीशैल बनशेट्टी माजी नगरसेवक नागेश वल्याळ, अशोक कटके, अमर बिराजदार, सागर अतनुरे, बंटी बेळमकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि सध्या काँग्रेसवासी असलेले प्रा. अशोक निंबर्गीही उपस्थित होते.
माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बनशेट्टी यांची उमेदवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अर्ज भरल्यानंतर माजी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, मी आजवर केलेल्या कामाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने उमेदवारी दिली नाही. मी देखील लिंगायत आहे, मी देखील मानकरी आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला उध्वस्त करून आम्ही या परिसरात भाजपची वारंवार सत्ता आणली आहे. असे असताना मला डावलले गेले. त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शहर उत्तर विधानसभेतील महिला भगिनी आणि मतदार सुज्ञ आहेत ते मला निश्चित विजयी करतील, असा विश्वासही माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बनशेट्टी यांनी मानाचा आजोबा गणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद थोबडे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजाभाऊ माने आदी उपस्थित होते.
माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे प्रा. अशोक निंबर्गी, बीआरएसचे नागेश वल्याळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बंटी बेळमकर यांची उपस्थिती उपस्थितांमध्ये ठळकपणे अधोरेखित झाली.