सामर्थ्यसंपन्न भारतासाठी श्री शिवछत्रपतींचाच मार्ग सर्वोत्तम
मोहन शेटे : जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळ व्याख्यानमालेचे उद्घाटन
सोलापूर : प्रतिनिधी
देश महासत्तेकडे वाटचाल करीत असताना सामर्थ्यसंपन्न भारतासाठी श्री शिवछत्रपतींचाच मार्ग सर्वोत्तम आहे, असे प्रतिपादन शिवचरित्र अभ्यासक मोहन शेटे (पुणे) यांनी केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या ४७ व्या वर्षाच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवारी शिवस्मारक सभागृहात झाले.
सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणेश पूजनाने करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक पुरुषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे उपस्थित होते.
मोहन शेटे यांनी 'छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन केले. व्याख्याते श्री. शेटे म्हणाले, श्री शिवराज्याभिषेकाचा दिवस संपूर्ण भारत वर्षासाठी स्वातंत्र्याचा सोहळा होता. मात्र छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्यानंतर त्यांनी दिलेली शिकवण काही दशकांनंतर भारतीय विसरले. परिणामी, इंग्रजांचे राज्य भारतावर आले. त्याची किंमत आपल्याला १५० वर्षे चुकवावी लागली. भारताचा पाकिस्तान होऊ नये असे वाटत असेल तर छत्रपति श्री शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणावी लागेल. श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान शंकर, गणपती, दुर्गामाता असे आपले सर्व देव लढणारे आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन छत्रपति श्री शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यानंतर मराठ्यांनी नर्मदा, यमुना ओलांडत अटकेपार भगवा झेंडा रोवला, असेही व्याख्याते श्री. शेटे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की छत्रपति श्री शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या घरापर्यंत आले असत्या. देशासमोरील आगामी काळातील संकटे ओळखून छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा मार्ग पत्करणे हा एकमेव मार्ग आपल्याकडे असल्याचेही व्याख्याते मोहन शेटे यांनी सांगितले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बँकेच्या उपसरव्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, व्याख्यानमाला समितीचे प्रमुख मदन मोरे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
जागृती देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर विनायक कुरापाटी यांनी आभार प्रदर्शन केले.
---------
आज व्याख्यानमालेत
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या बौद्धिक व्याख्यानमालेत आज (सोमवारी) मुंबई येथील विचारवंत अनय जोगळेकर 'बलशाली भारत विस्तारणारी क्षितिजे' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. सोलापूरकरांनी सायंकाळी ६.३० वाजता शिवस्मारक सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.