इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासु सुधा मूर्ती यांनी घेतली भिडे गुरुजींची भेट

नमस्कार करून घेतले आशीर्वाद : ट्विटरवर अपलोड केला व्हिडिओ

इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासु सुधा मूर्ती यांनी घेतली भिडे गुरुजींची भेट

सोलापूर : प्रतिनिधी

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासु, ' इन्फोसिस ' चे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी सांगलीत येऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची भेट घेतली. भिडे गुरुजींच्या पाया पडून त्यांनी आशीर्वाद घेत चर्चाही केली.

सुधा मूर्ती आणि भिडे गुरुजी यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुधा मूर्ती यांनी मंगळवारी आवर्जुन सांगलीत येऊन भिडे गुरुजींची भेट घेतली.

याबाबत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हणमंत पवार म्हणाले, वर्षभरापूर्वी सुधा मूर्ती यांनी भिडे गुरुजी यांना भेटण्यासाठी दोन वेळा संपर्क केला होता परंतु तांत्रिक कारणामुळे त्यांची भेट झालेली नव्हती. मंगळवारी त्या योगायोगाने सांगलीत आल्यामुळे त्यांनी आवर्जून गुरुजींची भेट घेतली असेही श्री. पवार यावेळी म्हणाले. भेटीनंतरचा व्हिडिओही सुधा मूर्ती यांनी ट्विटरवर अपलोड केला आहे.

यशस्वी लेखिका, सामाजिक कार्यात आपले उत्तरदायित्व जाणून प्रचंड मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि इन्फोसिस सारख्या बड्या कंपनीचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती यांच्या कामात त्यांना मोलाची मदत करणाऱ्या सुधा मूर्ती यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची भेट घेतल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघांच्या भेटीच्या या व्हिडिओला लाखो जणांनी पसंती दिली आहे.