मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली कार्यकर्त्याची मागणी

मनीष काळजे यांच्या कार्यालयास दिली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली कार्यकर्त्याची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावना कशा जपाव्यात त्याचे आगळे वेगळे उदाहरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारच्या दौऱ्यात घालून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांची मागणी पूर्ण करत मनीष काळजे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील संपर्क कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी भेट दिली.

राजकारणात नेता आणि कार्यकर्ता हे नाते आगळे वेगळे असते. कार्यकर्त्यांच्या भावना जपणारा नेताच लोकप्रिय ठरतो. कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरीही त्यातून वेळ काढून आपली मागणी पूर्ण करावी अशी साहजिक अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. मात्र प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठीचा वेळ किंवा इच्छा असतेच असे नाही. कायम जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये राहणारे अशी ख्याती असलेल्या एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंढरपुरातून मुंबईला विमानाने जाताना सोलापूरात येऊन त्यांचे समर्थक मनिष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर काहीवेळ कार्यालयात थांबून ते विमानाने मुंबईला रवाना झाले.
----------
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण

शिवसैनिक म्हणून काम करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे पाठीशी नेहमीच उभे राहिले आहेत. त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी माझ्या मागणीचा विचार करून माझ्या कार्यालयास भेट दिली हा माझ्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. भविष्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यासारख्या तमाम कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून सोलापूरच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचे योगदान देतील असा मला विश्वास आहे.
--- मनीष काळजे, माजी जिल्हाप्रमुख युवा सेना