पावसासोबत सोलापूरकर झाले भक्तीरसात चिंब

'तीर्थ विठ्ठल' कार्यक्रमातून घडले विठुरायाचे दर्शन

पावसासोबत सोलापूरकर झाले भक्तीरसात चिंब

सोलापूर : प्रतिनिधी

एकीकडे सोलापुरात पाऊस सुरू असताना 'भेटी लागी जीवा...' 'तीर्थ विठ्ठल...' 'अबीर गुलाल...' 'बोलावा विठ्ठल..' अशा एकाहून एक भक्तिमय अभंग गीतांनी शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूरकर पावसासोबत भक्तीरसातही चिंब झाले. निमित्त होते 'तीर्थ विठ्ठल' या सांगीतिक कार्यक्रमाचे.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वीर इव्हेंट्स आणि विश्वविनायक प्रतिष्ठान यांच्याकडून पी. एन. रिअल इस्टेट कंपनी प्रस्तुत, 'तीर्थ विठ्ठल' हा कार्यक्रम सादर झाला. 

मराठी मालिका-चित्रपट सृष्टीतील प्रख्यात पार्श्वगायक आणि 
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोळघरचे वंशज अवधूत गांधी आणि निधी हेगडे यांनी अभंग, गीते सादर केली.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज या गाजलेल्या चित्रपटांचे संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांची विशेष उपस्थिती होती. 

प्रारंभी अवधूत गांधी आणि सहकाऱ्यांनी पंचपदी सादर केली. यानंतर श्री. गांधी यांनी 'काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती...' ही रचना सादर केली. 'भेटी लागी जीवा..' हा अभंग निधी हेगडे यांनी सादर केला. यानंतर अवधूत गांधी यांनी सादर केलेल्या 'तीर्थ विठ्ठल' या गीतामुळे सोलापूरकरांना ठेका धरायला भाग पाडले. 'बोलावा विठ्ठल' या निधी हेगडे यांनी म्हटलेल्या या गीताने सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 'अबीर गुलाल...' या गीताला वन्स मोअर मिळाला.

या कार्यक्रमाचे संगीत संयोजन नागेश भोसेकर यांनी केले. अभय नलंगे यांनी कार्यक्रमाचे रसाळ निरूपण केले. या कार्यक्रमातील गीतांना तबला साथ ओंकार सूर्यवंशी, संजय बागेवाडीकर, पखवाज साथ नागेश भोसेकर, संबळ साथ सोमनाथ तरटे यांनी केली. ओंकार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. भर पावसातदेखील या कार्यक्रमास सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.