आषाढी एकादशी दिनी दुमदुमणार अभंगवाणी
दीपक कलढोणे करणार सादरीकरण
सोलापूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशी दिवशी उद्या रविवार दि. १० जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोविंदश्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे गायक दीपक कलढोणे यांचा अमृताची फळे हा कार्यक्रम सादर होणार आहे.
निवेदन ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांचे आहे. सोलापूरातील स्थानिक कलाकार सादर करीत असलेल्या या उपक्रमाचे यंदाचे सोळावे वर्ष असून दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, नगरसेवक शिवलिंग कांबळे, उद्योजक महावीर गुंडाळे, संजय अजनसोंडकर, गिरीश माळवदे तसेच डॉ. सुरेश व्यवहारे, डॉ. नयना व्यवहारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभंगवाणीसाठी संवादिनी व स्वरसाथ नीरज कलढोणे, वर्धराज मिर्जी यांची असेल. तर व्हायोलिनवर जयंत जोशी, तबल्यावर प्रसाद कुलकर्णी, मृदंगावर देवेंद्र अयाचित, तालवाद्यांवर अनंत जोशी व मल्लिकार्जुन कोरे, तानपुऱ्यावर निरंजनी कलढोणे व गायत्री पोतदार हे साथसंगत करणार आहेत. तसेच सूत्रनिवेदन जगदीश पाटील करणार आहेत.
रसिक व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.