यंदा मिरवणुकीत नंदीध्वज आडवे होणार नाहीत !

यात्रेच्या मानकऱ्यांनी मांडली भूमिका : दुपारी १ पर्यंत अक्षता सोहळा करण्याचा प्रयत्न

यंदा मिरवणुकीत नंदीध्वज आडवे होणार नाहीत !

सोलापूर : प्रतिनिधी

ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेत काढण्यात येणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीत यंदाच्यावर्षी नंदीध्वज पूजेसाठी आडवे करण्यात येणार नसल्याचा निर्णय यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी मंगळवारी जाहीर केला.

भाविकांच्या श्रध्देचा आम्हाला निश्चितच आदर आहे. परंतु भाविक करत असलेल्या पूजेमुळे नंदीध्वज मिरवणुकीला खूप उशीर होतो. परिणामी, नंदीध्वज ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहचत नाहीत. सर्वात मोठी समस्या अक्षता सोहळ्याच्या दिवशी निर्माण होते. नंदीध्वज संमती कट्ट्यावर वेळेत न आल्याने अक्षता सोहळ्यास आलेल्या हजारो भाविकांना ताटकळत बसावे लागते.

तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, शोभेचे दारूकाम आणि नंदीध्वज वस्त्रविसर्जन अशी रोज नंदीध्वज मिरवणुक काढण्यात येते. त्यामुळे आदल्यादिवशी मिरवणुकीला उशीर झाला तर पुढील दिवसांच्या मिरवणुकीवर परिणाम होतो. त्यामुळे नंदीध्वज मिरवणुक वेळेत होण्याकरिता मिरवणूकीत नंदीध्वज आडवे करुन पूजा करण्याला यंदा मज्जाव करण्यात आला आहे. त्याऐवजी नंदीध्वज उभे असतानाच भाविकांनी हार अर्पण करावेत, असा निर्णय सर्व मानकऱ्यांशी बोलून घेतल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी स्पष्ट केले.

सर्व भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही राजशेखर हिरेहब्बू यांनी केले.