कसबा गणपती मंडळ यंदा सादर करणार 'हा' देखावा

पारंपरिक वाद्यांसह निघणार श्रीं ची मिरवणूक

कसबा गणपती मंडळ यंदा सादर करणार 'हा' देखावा

सोलापूर : प्रतिनिधी

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे यंदाच्यावर्षी 'श्री नृसिंह अवतार' हा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास मेंगाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाची प्रतिष्ठापना मिरवणूक बुधवारी (दि. ३१ ऑगस्ट) सकाळी ९.३० वाजता चार हुतात्मा पुतळा येथून सुरु होणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत प्रतिवर्षाप्रमाणे ४०० युवकांचे कार्यकर्त्यांचे लेझीम पथक असेल. पंचरंगी ध्वज, सनई चौघडा, हलगी, बँड, सजवलेला घोडा, सामाजिक प्रबोधनात्मक चित्ररथ, लोकमान्य टिळकांची प्रतिमा असलेली बग्गी आदींचा समावेश या मिरवणुकीत असणार आहे.

गुरुवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता कसबा गणपती महिला मंडळातर्फे सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ५०० महिला सहभागी होणार आहेत.

शुक्रवारी (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते श्री कसबा गणपती मंडळाच्या देखाव्याचे उदघाटन होणार आहे, असे उत्सव अध्यक्ष श्री. मेंगाणे यांनी सांगितले.

उत्सव काळात दररोज नित्यपुजा, रुद्राभिषेक, महापूजा, आरती, प्रसाद वाटप, भाविकांच्या हस्ते आरती आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस आनंद मुस्तारे, उपाध्यक्ष शिवानंद सोन्ना, बिपिन धुम्मा, पुष्कराज मेत्री, विनायक शरणार्थी उपस्थित होते.
-----------------
श्री कसबा गणपती मंडळाची सामाजिक बांधिलकी

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १८५ जणांनी रक्तदान केले. गणेशोत्सव काळातही ९ सप्टेंबरपर्यंत दररोज रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून ३५० रक्तपिशव्या संकलनाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.