'द कश्मीर फाईल्स' च्या विशेष शोचे उद्या आयोजन

माजी नरसिंग मेंगजी यांचा उपक्रम

'द कश्मीर फाईल्स' च्या विशेष शोचे उद्या आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी

काश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची माहिती देणाऱ्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या विशेष शो चे उद्या (गुरुवारी) दुपारी १२.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्याकडून हा शो मोफत दाखवला जाणार आहे. 

चित्रपटाची मर्यादित तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटांसाठी नागरिकांनी नवी पेठेतील मेंगजी होम डेकॉर येथे लवकरात लवकर संपर्क साधावा, तिथे चित्रपटगृहाचे नाव तसेच अधिक माहिती मिळेल, असे माजी आमदार मेंगजी यांनी सांगितले.

या शोबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नरसिंग मेंगजी म्हणाले, "काश्मिरी पंडित आणि मेंगजी कुटुंबीयांच्या कहाणीत एक दुर्दैवी साम्य आहे. काश्मिरी पंडितांसारखीच परिस्थिती 2002 च्या सोलापूर दंगलीत मेंगजी कुटुंबीयांवर ओढवली होती. त्यावेळी मेंगजी कुटुंबीयांचे शनिवार पेठेतील घर समाजकंटकांनी पेटवून दिले होते. आमच्या घरात त्यावेळी महिला, लहान मुले, ज्येष्ठ मंडळी असे सुमारे 25 सदस्य होते. समाजकंटकांनी त्या सगळ्यांनाच आगीच्या भक्ष्यस्थानी देण्याचा प्रयत्न केला. 'सबको जिंदा जलादो,' अशी नारेबाजी बाहेर सुरू होती. तीन तास झाले तरी पोलिसांचा थांगपत्ता नव्हता. सुदैवाने घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखून कशीबशी आपली सुटका करून घेतली. हा प्रसंग आमच्या घरातील सदस्य अजूनही विसरलेले नाहीत."

"1982 सालीही माझ्यावर अशाच प्रकारे समाजकंटकांनी तलवार हल्ला केला होता. त्यानंतर 2002 मध्ये थेट मेंगजी कुटुंबीयांचं घर पेटवून देण्यापर्यंत ते पोहोचले. केवळ संघ-भाजप कार्यकर्ते असल्यामुळेच आमच्यासारख्या शांतताप्रिय कुटुंबावर  निशाणा साधण्यात आला, ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत," असे श्री. मेंगजी म्हणाले.

"काश्मिरी पंडितांप्रमाणेच मेंगजी कुटुंबीयांवर 20 वर्षांपूर्वी ओढवलेल्या या परिस्थितीतून आपण सर्वांनी धडा घेण्याची गरज आहे. त्यासाठी द काश्मीर फाईल्स चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा," असे आवाहन माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी केले आहे.