तलाव अन मैदानाच्या नावात करा दुरुस्ती
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या धर्मवीर संभाजी तलाव आणि सावरकर मैदान यांच्या नावात तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागाकडून मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापौर श्रीकांचना यन्नम आणि महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांना श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, या तलावाचे नाव धर्मवीर संभाजी तलाव असे आहे. परंतु या तलावाचे नाव धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव असे असणे अपेक्षित आहे. केवळ धर्मवीर संभाजी तलाव या नावात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा उल्लेख नकळत एकेरी होतो. त्यामुळे या तलावाच्या नावात तातडीने दुरुस्ती करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव असे नामकरण करण्यात यावे.
तसेच गोल्डफिंच पेठ परिसरातील मैदानाचे नाव सध्या सावरकर मैदान असे आहे. या नावातही दुरुस्ती करून या मैदानाचे नाव हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान असे ठेवावे, अशी मागणी समस्त सोलापूरकरांच्यावतीने श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, सोलापूर विभागाने केली आहे.
श्री शिवप्रतिष्ठानच्या मागण्या :
१) धर्मवीर संभाजी तलावाचे नामकरण तातडीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तलाव असे करावे.
२) सावरकर मैदानाचे नाव तातडीने हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर मैदान असे करावे.
हे निवेदन देताना श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी सर्वश्री आनंद मुसळे, ओंकार देशमुख, अभिषेक इंगळे, लक्ष्मीकांत बिद्री, रमेश दळवी, नागनाथ पल्लोलू, योगीनाथ फुलारी, ऋषीकेष धारकाशिवकर, आदित्य कारकल, प्रशांत जमखंडी, अमित शिंदे आदी धारकरी उपस्थित होते.