भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान या पुस्तकाचे ९ ऑगस्ट रोजी प्रकाशन

सोलापूरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान या पुस्तकाचे ९ ऑगस्ट रोजी प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष व क्रांती दिनानिमित्त मंगळवारी (ता.९) ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता हि.ने. वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर लिखित ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. 

जटायु अक्षरसेवा प्रकाशनने या ग्रंथाची निर्मिती केली असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सिद्धेश्वर देवस्थान अध्यक्ष धर्मराज काडादी, अॅड. धनंजय माने, आणि ज्येष्ठ विचारवंत नरेश बदनोरे या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठान, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मोहन अंत्रोळीकर आणि के. एम. जमादार यांनी दिली.
-----------------
काय आहे या पुस्तकात ?
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सोलापूरचे योगदान रोमांचकारी आणि उल्लेखनीय आहे. सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल चार नरवीरांनी पत्करलेले हौतात्म्य आणि ब्रिटिश सरकारकडून शहरात पुकारला गेलेला मार्शल लॉ ( पाकरी कायदा) एवढीच मर्यादित माहिती बहुतांशी लोकांना आहे. या ग्रंथात स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय राहिलेल्या ६८ देशभक्त आणि त्यांच्या योगदानाची माहिती दिलेली आहे. याशिवाय लोकमान्य टिळक व सोलापूरकरांतील जिव्हाळा, म. गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडीत नेहरू आदींचे सोलापूरशी ऋणानुबंध, मॉर्शल लॉ, तेव्हाच्या वृत्तपत्रांतील पडसाद असे अनेक विषय साधार मांडल्याने या ग्रंथाचे मोल वाढले आहे.