सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतली काशी जगद्गुरूंची भेट
निंबाळ दौऱ्यानंतर साधला सोलापूरातील स्वयंसेवकांशी संवाद
सोलापूर : प्रतिनिधी
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. यावेळी देशातील विविध धार्मिक आणि अध्यात्मिक प्रश्नांवर दोघांनी चर्चा केली.
निंबाळ येथे जाण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत शनिवारी सोलापूरात आले होते. सरसंघचालक डॉ. भागवत सिद्धेश्वर एक्सप्रेसने शनिवारी सोलापूरात आले. गांधीनगर येथे ज्येष्ठ स्वयंसेवक मिलिंद फडके यांच्या घरी न्याहारी करून ते निंबाळ येथे गेले. रविवारी सायंकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिरात गेले. तेथे पूजा आरती करून त्यांनी काशी पिठाचे नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. या भेटीत सरसंघचालक आणि काशी पिठाचे जगद्गुरु यांच्यात देशभरातील विविध धार्मिक आध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हरिभाई देवकरण प्रशालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. २०२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. रा. स्व. संघाच्या या शताब्दी वर्षात प्रत्येक गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू होण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी डॉ. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या दौऱ्यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, विभाग संघचालक आप्पा गवारे, विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांसोबतच्या बैठकीनंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे पुण्याला रवाना झाले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.