रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी सजली बाजारपेठ

आकर्षक पणत्या, दिवाळीचे साहित्य मुंबईहून दाखल

रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी सजली बाजारपेठ

सोलापूर : प्रतिनिधी

कागदी, प्लास्टिक, जूट, वेलवेट, वुडन अशा रंगीबेरंगी आकाशदिव्यांनी सोलापूरच्या बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आकाशदिव्यांसह आकर्षक पणत्या, सुगंधी मेणबत्ती, लाइटिंग माळा आधी वस्तू मुंबईसह मोठ्या शहरातून विक्रीसाठी सोलापुरात उपलब्ध झाल्या आहेत.

अप्सरा, चंद्रमुखी, कस्तुरी, जाणता राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, जय श्रीराम अशा नावांचे आकाशदिवे तसेच लाकडी आकाशदिवे, महाराष्ट्रीयन थाट, चांदण्यांचे अनेक प्रकार, कागदी, पुठ्ठ्याचे, जूट कापडाचे आकाशदिवे, वेलवेट कापडचे आकाशदिवे, वूडन आकाश दिवे, पेपर बलून्सचे आकाशदिवे विक्रीसाठी आले आहेत. तसेच यंदा शिवप्रेमींसाठी छत्रपति श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले आकाशदिवेही उपलब्ध आहेत, असे जुळे सोलापुरातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जवळील विक्रेत्या लक्ष्मी जमादार म्हणाल्या.

त्याचबरोबर हँगिंग लाईट बॉटल्स, नक्षीकाम केलेल्या भारतीय पणत्यांचा गिफ्ट बॉक्स, सुगंधी कॅन्डल्स गिफ्ट बॉक्स, जेलीचे दिवे, लाईट रिफलेकटेड, पणत्या
कॅन्डल्स लाईट पाण्यारील पणत्याही मुंबईहून सोलापूरच्या बाजारपेठेत होलसेल दरात दाखल झाल्याचे जमादार यांनी सांगितले.

सोलापूरच्या बाजारपेठेत तब्बल ४०० प्रकारचे आकाशदिवे यंदाच्यावर्षी विक्रेत्यांनी आणले आहेत. १२५ रुपयांपासून तब्बल तीन हजार ५०० रुपयांपर्यंत आकाशदिवे उपलब्ध आहेत. यंदा पावसाचे वातावरण असल्यामुळे प्लास्टिकच्या आकाशदिव्यांना अधिक मागणी दिसून येत आहे. आकाश दिव्यांसह शुभ दिपावली, ओम, स्वस्तिक, शुभ लाभ चे स्टिकर ही बाजारात उपलब्ध झाल्याचे विक्रेते शहाजी पोकळे यांनी सांगितले.