महापालिका आणि जिल्हा प्रशासनात हवा समन्वय

शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : म्युकरमायकोसीसच्या औषधांचीही मागणी

महापालिका आणि जिल्हा प्रशासनात हवा समन्वय

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासन विविध प्रयत्न करत आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य समन्वय आणावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

पुरेशा वैद्यकीय सुविधेअभावी ग्रामीण भागातील नागरिक कोरोनावरील उपचारासाठी सोलापूर शहरात येतात. यातील काही नागरिकांचा दुर्दैवाने मृत्यू होतो. अशावेळी नियमानुसार कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह ग्रामीण भागात न पाठवता कोव्हिडच्या नियमांचे पालन करून सोलापूरातच अंत्यसंस्कार करणे अपेक्षित आहे. मात्र मृतदेह ग्रामीण भागात पाठवल्यानंतर संबंधित गावातील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांची गर्दी अंत्यसंस्कारासाठी होते. यातूनच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाटयाने होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाचे धोरण जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी मृतदेह ग्रामीण भागात देत नसल्याचे सांगितले. तर महापालिका प्रशासनाने मृतदेह ग्रामीण भागात देत असल्याचे सांगितले. इतक्या गंभीर मुद्द्यावर दोन्ही प्रशासनाची वेगवेगळी उत्तरे मिळाल्यानंतर दोन्ही प्रशासनात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे, असे श्री. बरडे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत आहे. या आजारावरील उपचारामध्ये अँटीफंगल औषधे (एम्फोटेरिसिन बी, एम्फोमुल, एम्फोट्रेट इंजेक्शन)
हा महत्वाचा भाग आहे. ती कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत.
त्याबरोबरच ती महाग देखील आहेत. त्यामुळे ही औषधे अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत.

कोरोना विरुद्धची लढाई आपण लढत असताना आपण लसीकरणाची आघाडीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय समर्थपणे सांभाळत आहात. त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांच्यावतीने आपले शतशः आभारी आहोत. सोलापूर जिल्ह्यातही लसीकरण सुरू आहे. मात्र लसींचा नियमित आणि पुरेसा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. परिणामी, सोलापूर जिल्हा लसीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे पडत आहे. त्यामुळे आपण सोलापूर जिल्ह्याला लसी अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री. बरडे यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन हे प्रयत्न करत आहेत. मात्र पुरेशा समन्वयाअभावी हे प्रयत्न काही प्रमाणात फोल ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण योग्य ते आदेश पारित करून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविण्यात आले आहे.