अरे व्वा ! पंढरपूरकरिता महाराष्ट्र शासनाची एक अब्ज २९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी

भाविकांना कोणत्या सुविधा मिळणार ? वाचा !

अरे व्वा ! पंढरपूरकरिता महाराष्ट्र शासनाची एक अब्ज २९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी

सोलापूर : प्रतिनिधी 

पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल एक अब्ज २९ कोटी रुपयांच्या आराखड्याला महाराष्ट्र शासनाकडून मंगळवारी मंजूरी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक मंगळवारी मुंबई येथे झाली. त्यात ही मंजूरी मिळाली.

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १ अब्ज २९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे आपण राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून देत आहे. त्याप्रमाणे या तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. यासर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गूणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज, आमदार समाधान अवताडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आदी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते. तसेच जळगांव, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्याबाबत सविस्तर सादरीकरण व त्यातील प्रकल्प आणि सुविधांची माहिती सादर करण्यात आली.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक येत असतात. आषाढी आणि कार्तिक वारीसाठी लाखो वारकरी आणि भाविक पर्यटक पंढरपुरास येतात. त्यांच्यासाठी अद्ययावत असा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सुमारे १६ हजार चौरस मीटरच्या या मंडपात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सहा हजार भाविकांची सोय करण्यात येईल. या सर्वांना वेळेनिहाय टोकन पद्धतीने प्रवेश देण्यात येईल. याशिवाय त्यांना स्कायवॉक पद्धतीच्या एक किलोमीटरची दर्शन रांगही असेल. या मंडप आणि दर्शन रांगेमुळे भाविकांना सुरक्षित, सुसह्य आणि सोयी-सुविधांनी युक्त अशी दर्शनाची सोय उपलब्ध होणार आहे.

स्कायवॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा त्रास होणार नाही. तसेच भाविकांचा दर्शनासाठी लागणार वेळ कमी होणार आहे. मंडप आणि रांगेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, लिफ्ट, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. याठिकाणी भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन व्हावे यासाठी टोकन पद्धतीने प्रवेश दिला जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेतच त्यांना मंडप व रांगेत प्रवेश दिल्याने गर्दीचेही नियंत्रण होणार आहे. याशिवाय यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.