बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचे दिनांक जाहीर

श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांची माहिती

बाळे येथील श्री खंडोबा यात्रेचे दिनांक जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी

बाळे येथे श्री खंडोबा यात्रेस सोमवार (दि. १८ डिसेंबर) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्ठी व तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी (दि. १३ डिसेंबर) रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर चंपाषष्ठी निमित्त सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी काकड आरती अभिषेक व महापूजा पालखी सोहळ्याने यात्रेस उत्साहात मंगलमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. सोमवारी तसेच पहिला रविवार दिनांक २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर, ७ जानेवारी असे अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या रविवारी पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता अभिषेक व महापूजा, रात्री ८ वाजता अभिषेक व महापूजा, सायंकाळी ८.३० वाजता घोडा व नंदीध्वजासह पालखी सोहळा होणार आहे.

मंगळवार दि. १६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून  निमित्त महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होणार आहे. यावेळी पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे व गावडे आदी सर्व मानकरी व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येतो.

चंपाषष्टी सोमवार, तीन रविवार असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या राज्यातून येतात. तिसऱ्या रविवारी रात्री ८ वाजता शोभेचे दारूकाम होणार आहे. सोलापूर महापालिकेच्यावतीने सिटी बस सेवा आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रा काळात दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले राहणार आहे. देवस्थान ट्रस्टच्यावतीने या ठिकाणी नेटके नियोजन व चांगली व्यवस्था करण्यात आली असल्याचेही अध्यक्ष विनय ढेपे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेस सागर पुजारी, बंडोपंत ढेपे, आदिनाथ पुजारी, कल्लेश्वर पुजारी आदी उपस्थित होते.
----------------