भाजी घ्यायला गेल्या अन झाली साडे सहा लाखांची चोरी
चोरट्यांचा धुमाकूळ
सोलापूर : प्रतिनिधी
दरवाजा पुढे करून गृहिणी भाजी घ्यायला गेल्या असताना चोरट्याने तब्बल साडे सहा लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना होटगी रस्त्यावर घडली. गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने सोलापूरकरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
होटगी रस्त्यावरील बालाजी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या दीप्ती जय आनंद यांच्या घरात सोमवारी ही घटना घडली. याबाबत मंगळवारी सायंकाळी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी दीप्ती आनंद यांचे पती जय आनंद हे अंघोळीला गेले असताना दीप्ती आनंद या दरवाजा पुढे करून भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी चोरट्याने त्यांच्या घरातील बेडरूममधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे ड्रॉवरच्या चाव्या ड्रॉवरच्या जवळच ठेवल्या होत्या. ही संधी साधून चोरट्याने हे दागिने पळविले.
सोन्याचे चार मंगळसूत्र, १३ अंगठ्या, दोन लॉकेट, एक नेकलेस, झुबे, कर्णफुले, रिंगा, पेंडल, कडे, एक मोती, एक माणिक, ६० हजार रुपये किमतीचे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने शिवाय १८ हजार रुपये रोख रक्कम असा तब्बल सहा लाख ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून पोलिस या चोरट्यांचा तपास करण्यात अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे. शहरात सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत
ज्या ठिकाणी चोरीची घटना घडली त्या बालाजी अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी सूचना पोलिसांकडून वारंवार देऊनही अनेक सोसायटी, अपार्टमेंटच्या आवारात कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अशा घटना घडल्याच तर चोरीचा छडा लावण्यासाठी कॅमेरे बसविणे अत्यंत आवश्यक आहे.