चिमणीच्या पाडकामाबाबत आज दिवसभरात काय काय घडले ?
उद्या काय होणार ? वाचा सविस्तर बातमी
सोलापूर : प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बहुचर्चित चिमणीचे पाडकाम करण्याच्या कारवाईस बुधवारी सकाळपासून प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रारंभ झाला. मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांनी साखर कारखाना परिसराचा ताबा घेतला होता.
बुधवारी क्रेन आणि इतर यंत्रांच्या साह्याने चिमणीच्या पडकामाच्या कारवाईस सुरुवात करण्यात आली. चिमणीला बाजूने लावण्यात आलेले पत्रे यंत्राच्या सहाय्याने काढण्यास सुरूवात झाली. तसेच चिमणीच्या खालील कचरा, टायर आणि इतर अनावश्यक वस्तू काढून टाकण्यात आल्या. प्रत्यक्ष चिमणीचे पाडकाम सुरू करण्याबाबतची अंतिम पाहणी देखील बुधवारी प्रशासनाकडून करण्यात आली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, चिमणीवर बुधवारी दोरखंड बांधण्यात आले असून प्रत्यक्ष चिमणी पाडकाम कारवाई गुरुवारी दिवसभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण खबरदारी यावेळी प्रशासनाकडून घेण्यात आली होती परंतु काही अनुचित प्रकार घडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. यावेळी तब्बल १२०० ते १३०० पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी दिवसभरात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडू नये अशी मागणी करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सुमारे २०० आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली. हिच मागणी घेऊन मनपाचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, काँग्रेसचे प्रा. अशोक निंबर्गी आदी अनेक नेत्यांनी कारवाईच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यात आले.
सोलापूर ग्रामीणअंतर्गत 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मनाई आदेश
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत चिमणी पाडण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका, मोहोळ, कामती, मंद्रुप, अक्कलकोट उत्तर, अक्कलकोट दक्षिण, वळसंग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनिश्चित कालावधीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये याबाबतचा मनाई आदेश निर्गमित केला आहे.
वरील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अत्यावश्यक कारण / सेवा, धार्मिक कारण वगळता ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणे, पेट्रोल पंप धारकांना बाटलीमध्ये सुटे डिझेल, पेट्रोल विक्री करणे, धरणे, मोर्चे, निदर्शने अशी कोणत्याही प्रकारची आंदोलने करणे, ज्वालाग्राही पदार्थ विनाकारण बाळगणे या बाबींना मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, अशा व्यक्ती विरुध्द संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
चिमणी पाडकाम कारवाईबाबत गुरुवारी काय प्रक्रिया करण्यात येते ? श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी उद्या गुरुवारी दिवसभरात पडणार का ? याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.