चोरी करण्यासाठी आईनेच पाठवले मुलीला !
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघड केली पावणे तीन लाखांची चोरी
सोलापूर : प्रतिनिधी
ज्या आईने आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत त्या आईनेच अवघ्या १२ वर्षांच्या मुलीला चोरी करण्यास शिकवले अन ती बिचारी यात फसली. आईच्या सांगण्यावरून तिने तब्बल पावणे तीन लाख रुपयांची चोरी केली, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली.
मिलिंद नगर येथे राहणाऱ्या कविता आनंद चंदनशिवे या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी गेल्या असताना त्यांच्या पर्समधील सोन्याच्या बांगड्या चोरीस गेल्या होत्या. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यापूर्वीही अशाच एका घटनेत लहान मुलीने चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती.
दुसऱ्या घटनेनंतर सावध झालेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मात्र चोरी करणारी लहान मुलगी असल्यामुळे तिला शोधणे अत्यंत कठीण होते. शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांचे पथक याकामी तपास करत होते. त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुल गांधी झोपडपट्टी येथे राहणारी रेखा साळुंखे ही महिला तिच्या मुली बरोबर सोन्याचे दागिने विकण्यासाठी सराफ बाजारात येत आहे. या माहितीवरून तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता या महिलेने आपल्या मुलीलाच दोन ठिकाणी चोरी करण्यासाठी पाठवल्याचे सांगितले. अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलिसांनादेखील या घटनेचे मोठे आश्चर्य वाटले.
अखेर पोलिसांनी या महिलेकडून तब्बल दोन लाख ७६ हजार रुपये किमतीचे ७८.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करत दोन चोऱ्या उघडकीस आणल्या.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल इमाम इनामदार, पोलिस नाईक शंकर मुळे, राजेश चव्हाण, विजयकुमार वाळके, संदीप जावळे, सुहास अर्जुन, आरती यादव, आयेशा फुलारी, संजय काकडे, विजय निंबाळकर यांच्या पथकाने केली.
-----------
पोलिसांनी तपासले ४६ कॅमेरे
या प्रकरणी पोलिसांनी सराफ बाजारातील ४६ सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. यातून मिळालेली माहिती गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना उपयुक्त ठरली. त्यामुळे सोलापूरकरांनी दुकान, कार्यालय, घर अशा महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------
नियमित वाचा महाबातमी न्यूज पोर्टल
पुरुषोत्तम कारकल :- ९८६०८२२२८३